Dhangar Student Scheme : धनगर विद्यार्थ्यांच्या योजनेत घोळ, ABP माझाकडून पोलखोल Special Report

समाजातील मागास घटकातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. बहुजन कल्याण मंत्रालयाच्या 'श्रीमंत राजे यशवंतराव होळकर योजना' या धनगर समाजातील मुलांसाठी असलेल्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे एबीपी माझाच्या तपासात समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील काही शाळांमध्ये या योजनेचा गैरवापर करून कोट्यवधी रुपये उकळले जात असल्याचे वास्तव उघड झाले. या योजनेअंतर्गत धनगर समाजातील गरीब विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण आणि वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. प्रत्येक विद्यार्थ्यामागे संस्थाचालकांना प्रतिवर्षी सत्तर हजार रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, एबीपी माझाच्या 'इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट'मध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल आणि योगेश्वर इंग्लिश स्कूल यांसारख्या शाळांमध्ये वसतिगृहाची कोणतीही व्यवस्था नव्हती, तसेच कॉम्प्युटर लॅबसारख्या सुविधाही कागदावरच होत्या. एका वसतिगृहात १७ विद्यार्थी एकाच खोलीत राहत असल्याचे आढळले, तर एका बेडवर दोन ते तीन विद्यार्थी झोपत होते. नियमानुसार, प्रत्येक विद्यार्थ्याला २४ चौरस फूट चटई क्षेत्र मिळणे बंधनकारक आहे, परंतु या नियमांचे उल्लंघन झाले. स्वच्छता प्रसाधने, गणवेश आणि शालेय साहित्य पुरवणे बंधनकारक असतानाही ते उपलब्ध नव्हते. वसतिगृहांसाठी सरकारने घालून दिलेले बावीस निकष पाळले गेले नाहीत. या प्रकरणांवरून प्रश्न विचारला असता, संबंधित मंत्र्यांनी सांगितले की, "आज जी आपण बातमी दिली आहे, ती आम्ही ताबडतोब तपासणी करायला सांगितलेली आहे आणि तपासणी करुन जर अशी असेल तर त्या शाळांच्या त्यावर आम्ही स्थगिती देऊ. जर ते व्यवस्थित नसेल आणि ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये आम्हाला खालून जर रिपोर्ट चुकीचा पाठवली असेल तर त्यांच्यावरही आम्ही कठोर कारवाई करु." कागदावर विद्यार्थ्यांची संख्या वेगळी आणि प्रत्यक्षात वेगळी असल्याचेही उघड झाले. मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola