Ajit Pawar Funeral : महाराष्ट्राचा वाघ गेला..लाडक्या बहिणींनी फोडला टाहो
Ajit Pawar Funeral : महाराष्ट्राचा वाघ गेला..लाडक्या बहिणींनी फोडला टाहो
Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात गेल्या साडे चार दशकांपासून झंझावात निर्माण केलेल्या, आपल्या रोखठोक शैलीने अनेकांना चकित करून सोडलेल्या, कामाचा माणूस म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत ठेवलेली प्रतिमा, ग्रामीण महाराष्ट्राशी जोडलेली नाळ, स्वत:साठी राजकीय विद्यापीठ करून घेताना दिलेला शब्द मोडायचा नाही, आपण कामाचा माणूस आहे हे तहहयात जपताना केलेला संघर्ष या आणि असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आज (29 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. यावेळी अवघ्या बारामतीसह राज्यात एकच सन्नाटा पसरला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजित दादा अमर रहे चा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी काटेवाडीपासून ते विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या अखंड प्रेमाची साक्ष देत होता. नेहमी खडसावणरे दादा, मदतीसाठी धावणारे दादा आज निपचित आहेत हे अनेकांसाठी काळीज कुरतडणारे होते. त्यामुळे अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात चबुतरा उभारण्यात आला होता. चबुतऱ्यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते.
कुटुंबीयांकडून अजितदादांचे अत्यंदर्शन
आज अजित पवार यांचे पार्थिव सकाळी काटेवाडीत ठेवण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या जमावाला अश्रु अनावर झाले. यावेळी झालेली अभूतपूर्व गर्दी पोलिसांना सुद्धा रोखणं अशक्य झालं होतं. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विनंतीनंतर जमाव नियंत्रित झाला. अजित पवार यांनी मुळगावी श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या पार्थिवाचे पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या भगिनी तसेच सून यांनी अंत्यदर्शन घेतले.