Mira Road Protest: मराठी-अमराठी संघर्ष तीव्र, MNS-शिवसेनेचा विराट मोर्चा
Continues below advertisement
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मराठी आणि अमराठी यांच्यातील संघर्ष मीरा रोडमध्ये अधिक तीव्र झाला आहे. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याच्या कानशिलात लगावल्याच्या घटनेनंतर गुरुवारी परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. याला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीने आज मीरा रोडमध्ये विराट मोर्चा काढला. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मध्यरात्री मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सकाळपासून मीरा रोड परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. मोर्चासाठी मनसे पदाधिकारी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. महिला आंदोलक आणि पोलीस यांच्यात अनेक ठिकाणी हुज्जत झाली. अखेर पोलिसांच्या परवानगीविनाच ओम शांती चौकाच्या दिशेने मोर्चा निघाला. चौकात मोर्चानं विराट रूप धारण केले. पोलिसांनी अविनाश जाधवांसह स्थानबद्ध केलेल्या नेत्यांची सुटका केली. माजीवाडाचे आमदार प्रताप सरनाईक मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले, मात्र त्यांना मोर्चेकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले आणि त्यांना अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत माघारी परतावे लागले. लोकल ट्रेनने संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई मीरा रोडमध्ये पोहोचले. त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांची साथ मिळाली. थोड्याच वेळात अविनाश जाधव देखील मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले. नेत्यांनी भाषणे केली. या मोर्चानंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. 'ज्यावेळी मराठी माणूस एकवट होतो तेव्हा सरकारला सुधावच लागतो,' असे एका नेत्याने म्हटले. मीरा रोडचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी मोर्चाचा हेतू वेगळा असल्याचा आरोप केला, तर अविनाश जाधव यांनी नरेंद्र मेहतांनाच या सगळ्यासाठी कारणीभूत ठरवले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement