Malls Entry : लसीच्या दोन डोसची अट शिथील करण्याची मागणी,बहुतांश कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण नाही
राज्यात सर्व मॉल्स रात्री दहा वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार अजूनही काही मॉल्स सुरु होऊ शकलेले नाहीत. राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार मॉल्समधील सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस आणि त्यातही दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणं आवश्यक आहे. याच एका नियमामुळं मुंबईतील अनेक मॉल्स अजूनही खुले होऊ शकलेले नाहीत.
मॉल्समधील अनेक दुकान मालक, दुकानात काम करणारे कर्मचारी, मॉल्समध्ये काम करणारे कर्मचारी यांचं लसीकरण पूर्ण झाले नाही. त्यामुळं मॉल्स खुले ठेवण्यास परवानगी मिळूनही मॉल्समधील दुकानं सुरू करता येत नाहीयत. त्यामुळं मॉल्समधील कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं लस देण्यात यावी, तसंच लशींच्या दोन डोसची अट तातडीनं शिथिल करावी अशी मागणी फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनकडून करण्यात आली आहे.