Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
नाशिकमध्ये महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. नाशिक विधान परिषदेतील विजयानंतर गोकुळ गीते यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी निवडणुकीतून माघार कधीच घेतली नव्हती. मात्र महायुतीच्या नेत्यांच्या विनंतीनंतर प्रचार थांबवला होता, परंतु मी घरात बसलेलो असताना माझ्या कार्यकर्त्यांनी मित्रांनी गुप्त प्रचार केला, असं गोकुळ गीतेंनी सांगितले. तसेच शेवटच्या दिवसापर्यंत माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. लोकांची स्वत:ची वैचारिक मतं असतात. नरेंद्र दराडेंनी विश्वास गमावला म्हणून गोकुळ गिते आमदार झाले. माझ्या यशात मीडियाचा मोठा सहभाग होता, असंही गोकुळ गीते म्हणाले. तसेच निवडणूक कार्यकर्त्यांनी पुढे नेऊन ठेवली होती. हा सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. एकनाथ शिदेंनी तुम्हाला मुंबई बोलावले असून त्यासाठी नाशिकमध्ये विमान पाठवले, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर मी विमानात बसलो, तरी माझे पाय जमिनीवरच राहतील, असंही गोकुळ गीतेंनी सांगितलं.मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला. माझा विजय त्यांना समर्पित करतो मी घरात बसलेलो असताना माझ्या कार्यकर्त्यांनी मित्रांनी गुप्त प्रचार केला. नाशिकमध्ये निष्क्रिय उमेदवार दिलेला होता. महायुतीच्या नेत्यांच्या शब्दाला मी मान दिला आणि प्रचार थांबवलेला होता. परंतु कार्यकर्त्यांनी त्यांचे काम सुरू ठेवलं. त्यासाठी मी माफी मागतो, असं गोकुळ गीतेंनी स्पष्ट केलं. संपूर्ण प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडी, इस्लाम पार्टीने मदत केली. त्यांचे आभार मानतो. एकनाथ शिंदेंना भेटण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. कोणत्या पक्षात प्रवेश करायचा असल्यास माझ्या कार्यकर्त्यांना विचारून हा निर्णय घेईन, असं गोकुळ गीते म्हणाले.