Politics: जरंडेश्वर साखर कारखान्यावरुन अजित पवार आणि किरीट सोमय्या यांच्यात शाब्दिक युद्ध: ABP Majha
जरंडेश्वर साखर कारखान्यावरुन आरोपनाट्य अजुनही सुरूच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेवर आज उत्तर दिलं. त्यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. मी अनेकदा उत्तर देणं टाळलं. वस्तुस्थिती समोर यावी म्हणून आज बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, मात्र त्यात काहीही निष्पन्न झालं नाही. साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप केले जात आहेत, 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार हा खोटा आरोप आहे, असंही अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी राज्यातील विकल्या गेलेल्या कारखान्यांची भलीमोठी यादीच वाचून दाखवली. त्यांनी कारखाने विक्रीच्या व्यवहाराचे रकमांसह वाचन करुन दाखवलं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एकूण 30 कारखाने विकले असल्याची यादी अजित पवारांनी सांगितलं. या संदर्भात बोलताना आता किरीट सोमैया यांनी पुन्हा सवाल उपस्थित केला आहे.