Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. सातारा जिल्हा परिषदेवर स्वबळावर सत्ता आणायची या इराद्यानं निवडणूक लढलेल्या भाजपच्या इराद्यांना मतदारांनी ब्रेक लावल्याचं निकालातून पाहायला मिळालं आहे. सातारा जिल्हा परिषदेत भाजपला 27 जागा मिळाल्या असून त्यांच्या विरोधात लढलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास त्यांना सत्ता स्थापनेची संधी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 आणि शिवसेनेनं 15 अशा एकूण 35 जागा जिंकल्या असून सातारा जिल्हा परिषदेत बहुमताचा आकडा 33 इतका आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र शेळके वर्णे जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीला त्यांचा पाठिंबा मिळेल, असं चित्र आहे. सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. साताऱ्याच्या 65 पैकी 9 जिल्हा परिषद गट ओबीसी महिलांसाठी राखीव होते. या नऊ गटातील एका जिल्हा परिषद सदस्याला अध्यक्षपदी संधी मिळेल.
सातारा जिल्हा परिषदेचं अध्यपद कोणाला?
सातारा जिल्हा परिषदेच्या गट रचनेनंतर गटनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेचे 9 गट ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. यात कराड, पाटण, खटाव मधील प्रत्येकी दोन जिल्हा परिषद गटांचा समावेश होता. तर, कोरेगाव, सातारा आणि जावळी तालुक्यातील एका जिल्हा परिषद गटाचा समावेश होता. कराडमध्ये काले आणि विंग, पाटणमध्ये मारुल हवेली आणि मल्हारपेठ, खटाव तालुक्यात औंध आणि बुध तर साताऱ्यात कोडोली, जावळीत कुडाळ आणि कोरेगावमध्ये वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटात ओबीसी आरक्षण लागू होतं.





















