Shiv Sena Symbol Row | सुप्रीम कोर्टात सुनावणी, ठाकरेंच्या मागणीवर आज निर्णय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल्ल बागची यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यापासून रोखावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाप्रमाणेच शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत अंतरिम आदेश द्यावा, अशी विनंती ठाकरेंच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात अजित पवारांना घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचे जाहिरातीतून प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्याच धर्तीवर शिंदे गटालाही मुंबई महापालिकेत धनुष्यबाण वापरताना 'न्यायप्रविष्ट' हा शब्द लिहावा लागणार का, हे आजच्या सुनावणीत स्पष्ट होईल. यावर बोलताना अडवोकेट सिद्धार्थ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली की, 'पक्ष आणि चिन्ह टेम्पररी आहे, परमनंट नाहीये. अजून सुप्रीम कोर्टाचा निर्णय यायचा आहे.' आजच्या सुनावणीत शिंदे गटाला नोटीस बजावून एक ते दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे.