Sanjay Raut on Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं, संजय राऊतांची खुली ऑफर
Sanjay Raut on Ganesh Naik: माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे, भाजपत राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही. गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावे, विजय गणेश नाईकांचाच होईल, अशी साद शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घातली आहे. या प्रवृत्तीला (एकनाथ शिंदे गट) छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शहांचा आहे. भाजपमध्ये राहून तुम्हाला फक्त आमदार आणि मंत्रिपद मिळतील, पण लढण्याचे बळ कधीच मिळणार नाही, असे राऊत म्हणाले.
हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवलं
राऊत म्हणाले की, नवी मुंबईत आणि ठाण्यातील मोक्याचे भूखंड बिल्डरांच्या घशात कसे गेले, रस्ते आणि बगीच्यांसाठी राखीव असलेले भूखंड कसे दिले गेले, हा भ्रष्टाचार गणेश नाईक यांनी समजून घ्यावा. स्वतः गणेश नाईक म्हणतात की, हा भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर एकनाथ शिंदे यांना एक दिवस तुरुंगात जावे लागेल. भाजपने तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवले आहे, ही लढाई तुम्ही तिथे राहून लढू शकणार नाही.
टिपू सुलतान वाद आणि भाजपचे राजकारण
दरम्यान, भाजप जाणीवपूर्वक टिपू सुलतानसारखे विषय काढून लोकांना भ्रमिष्ट करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. कर्नाटक विधानसभेत भाजप नियुक्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानचा 'राष्ट्रपुरुष' म्हणून गौरव केला, तेव्हा तुम्ही का नाही रोखले? असा सवाल त्यांनी विचारला. मुंबईत भाजपच्याच काळात टिपू सुलतानच्या नावाने रस्ते आणि बगीच्यांना मंजुरी मिळाल्याचे ते म्हणाले. टिपू सुलतान 799 मध्ये ब्रिटिशांशी लढताना शहीद झाला, हे काही इतिहासकार मानतात. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगावे की, आम्ही ब्रिटिशांविरुद्ध कुठे लढलो, कुठे शहीद झालो किंवा साधे खरचटले तरी कुठे? छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. महाराजांनी स्वतः 'स्वराज्य' निर्माण केले, तर टिपूला राज्य वारसाहक्काने मिळाले होते, असे राऊत यांनी सांगितले.





















