Monsoon Rain : गुडन्यूज! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी?

Monsoon Rain : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या सर्वांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अंदमानात मान्सून (Monsoon Rain) दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. निकोबार बेटांवर मागील 24 तासांत सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र; दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भाग मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागानं दिली आहे. 

पुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी आज पूर्व मॉन्सून पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या 6 जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 27 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात मॉन्सून 6 जून आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस होताना दिसतोय तसेच येत्या 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मॉन्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील, जवळपास 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola