Mira Road Protest | मंत्री Pratap Sarnaik मोर्चात, आंदोलकांनी हुसकावले; सरकारमध्येच संभ्रम

मीरा भाईंदर परिसर मराठी आणि अमराठी वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) काढलेल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. या मोर्चात सत्ताधारी शिवसेनेचे नेते आणि सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक सहभागी होण्यासाठी आले होते. त्यांचा ओवळा माजीवाडा मतदारसंघ मीरा भाईंदर परिसरात येतो, त्यामुळे आपल्या मतदारसंघातील मराठी मतदारांची नाराजी टाळण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी ते मोर्चात सहभागी झाले. मात्र, मोर्चात पोहोचल्यावर आंदोलकांनी सरनाईकांविरोधात घोषणाबाजी करत त्यांना अक्षरशः हुसकावून लावले. या घटनेनंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. "प्रताप सरनाईक यांच्या बाबतीत इथे जे झालं ते योग्य नाहीये कारण तो ज्या वेळेला इथे आला त्यावेळेला मराठी माणूस म्हणून आला होता. जर एखादा मराठी माणूस आपल्या सोबत येत असेल तर त्याला प्रेमाने घेतलं पाहिजे," असे अविनाश जाधव यांनी म्हटले. या घटनेमुळे सत्ताधारी शिवसेनेतच संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे मंत्री प्रताप सरनाईक पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे ओढत होते, तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यापाऱ्यांच्या मोर्चालाही परवानगी नव्हती असे स्पष्ट केले. विरोधकांनीही शिवसेनेतील या समन्वयाच्या अभावाकडे लक्ष वेधत सरकारला प्रश्न विचारले. पायाखालची वाळू घसरल्याने मंत्र्यांना मोर्चात सामील व्हावे लागत आहे आणि तेच त्यांच्या सरकारला घरचा आहेर देत आहेत, अशी टीका विरोधकांनी केली. पोलीस आयुक्तांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही सरनाईक सहभागी झाले, कारण आपल्या मतदारसंघात मराठीसाठी आंदोलन होत असताना ते मागे राहू शकले नाहीत. त्यांनी केवळ आपल्या पक्षाच्याच नव्हे, तर आपल्याच सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola