Mira Bhayandar Marathi Morcha | पोलिसांच्या कारवाईनंतरही मोर्चा निघणारच, MNS ठाम

मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाआधी पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. काल रात्री साडे तीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे. तसेच वसई विरारमधील अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच, असा ठाम पवित्रा मनसेने घेतला आहे. आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी दिली, मग मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी नाकारणे ही दडपशाही आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. "सरकारने कितीही धरपकड केली तरी मोर्चा निघणारच," असे त्यांनी म्हटले आहे. भाजप मराठी अमराठी वाद पेटवून दंगली घडवण्याचे षडयंत्र रचत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. पोलिसांनी सर्व ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमला आहे. सर्व महत्त्वाचे चौक, ठिकाणे, रेल्वे स्टेशन्स आणि जंक्शन्स या सर्व ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालही रूट मार्च घेण्यात आला होता. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकारी आणि अमलदार दक्षतेने बंदोबस्त करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोर्चाला परवानगी नाकारलेली असल्याने कोणीही मोर्चाच्या ठिकाणी एकत्र येऊ नये. संपूर्ण आयुक्तालयामध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना कुठेही एकत्र येण्यास प्रतिबंध आहे. पोलीस दलाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीच्या अनुषंगाने बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. काही व्यक्तींना प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आले आहे. अपप्रेरणा देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मोर्चामध्ये सहभागी होणारे पदाधिकारी आणि संघटना अजूनही मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola