Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...
रायगड : खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी काळोखे कुटुंबीयांनी केली. त्यावर आपण काळोखे कुटुंबीयांच्या मागे ठामपणे उभे असून कुणालाही सोडणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.
नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर काहीच दिवसात मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि त्यांच्या गुंडांनी ही हत्या केल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
एकनाथ शिंदेंना भेटताच काळोखे कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. आरोपींवर मोका लावा, त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी काळोखे कुटुंबीयांनी यावेळी केली.
Eknath Shinde On Khopoli Murder : आरोपींना ठेचून काढू
एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी काळोखे परिवाराच्या मागे उभा आहे. लोकांनी ज्यांना विजयी केलं त्यांच्याविरोधात सूडाचं राजकारण करण्यात आलं. अशी घटना परत घडता कामा नये. माझं या केसवर लक्ष आहे. मी बघतो काय करायचं ते. कुणालाही सोडणार नाही, आरोपींना ठेचून काढू."
या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्याने दुर्लक्ष केलं त्या सचिन हिरेंना ताबडतोब निलंबित करा अशी मागणी यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.