Eknath Shinde : औरंगाबादचं नाव छ. संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव निर्णय सरकारनं
Maharashtra Cabinet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळानं आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत ठाकरे सरकारनं घेतलेला औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला. ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगित केला होता. दोन दिवसांपूर्वी 14 तारखेला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणे, थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड अशा निर्णयांचा सपाटा लावल्यानंतर आज पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. आजच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा पुनर्निणय घेण्यात आला. लवकरच ठराव करुन प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारनं घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, असंही ते म्हणाले.