Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Eknath khadse: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून, याच कार्यक्रमात नाथाभाऊंचा जाहीर भाजप प्रवेश होणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) आणि एकनाथ खडसे यांच्यात मुंबईत एक महत्त्वपूर्ण भेट झाली. या भेटीनंतर तर्क-वितर्कांना उधाण आले असतानाच, आता स्वतः एकनाथ खडसे यांनी थेट दिल्लीचा संदर्भ देत अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
Eknath khadse: अमित शाह यांनी फोन करून बोलावले होते: खडसेंचा दावा
एकनाथ खडसे म्हणाले, "होय, मी दिल्लीला गेलो होतो. अमित शाह (Amit Shah) यांनी मला फोन करून बोलावले होते. अमित शाह यांनी मला सांगितले की, 'भाजप जॉईन करो.' गिरीश महाजन म्हणतात की, माझा विरोध त्यांच्या पक्षप्रवेशाला नाही. मात्र, मला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले की, 'तुम्हाला जर पक्षात प्रवेश दिला, तर स्थानिक लोक काम करणार नाहीत.' 'खडसेंना पक्षात घेतले तर आम्ही लोकसभेची जागा पाडून टाकू', अशी थेट ब्लॅकमेलिंग केली जात आहे. याच कारणामुळे वरिष्ठांनी मला सांगितले की, 'तुम्ही लोकसभेत आमचे काम करा, पुढे पाहू.' मग माझ्या पक्षप्रवेशाला नेमका विरोध करतोय कोण?" असा थेट सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे.