Dada Bhuse On Sanjay Raut : संजय राऊतांना दिलासा, मानहानीचा खटला दादा भुसेंनी मागे घेतला
Dada Bhuse Sanjay Raut Defamation Case : मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा खटला अखेर मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेते मालेगाव न्यायालयात हसत-खेळत एकत्र पोहोचले आणि त्यानंतर हे प्रकरण निकाली निघाले.
मालेगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होती. यवेळी दादा भुसे आणि संजय राऊत दोघेही न्यायालयात एकाच वेळी पोहोचले. न्यायालयातही दोघे एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
Sanjay Raut: काय म्हणाले संजय राऊत?
सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मंत्री दादा भुसे माझ्या बाजूलाच बसले होते. न्यायालयानेही आम्हाला एकत्र पाहिले. आता हा विषय संपला आहे. आमचे संबंध पूर्वीपासून आहेत आणि तेच आज कामाला आले. जे काही घडले ते चुकीच्या माहितीवर आधारित होते.” तसेच हा वाद निर्माण होण्यामागे चुकीची माहिती कारणीभूत असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे Advay Hire यांच्यावर टीका केली. “ज्यांच्यामुळे हा विषय निर्माण झाला ते आता आमच्यात नाहीत. त्यामुळे हा विषय इथेच संपवूया,” असेही राऊत यांनी म्हटले.
Dada Bhuse: दादा भुसे यांनी खटला मागे घेतला
दादा भुसे यांनी सांगितले की, गिरणा साखर कारखान्यात 178 कोटी रुपयांचा घोटाळा झाला, अशी सामनातून बातमी आली होती. खा. संजय राऊत यांच्या माध्यमातून आरोप करण्यात आला होता. गिरणा सहकारी साखर कारखाना उभा राहण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. केवळ एक कोटी सत्तर लाख रुपये जमा केले होते. ते पैसे आम्ही आर्म स्ट्राँगला जमा केले होते. त्यामुळे मालेगावच्या जनतेची, शेतकऱ्यांची बदनामी झाली होती. त्यासंदर्भात आम्ही कोर्टात खटला दाखल केला होता आणि नोटीस पण दिलेली होती. खा. संजय राऊत यांनी शेतकऱ्यांची आणि जनतेची माफी मागितली आहे. त्यामुळे हा खटला मागे घेतला आहे. चुकीच्या आधारावर हा आरोप केलेला होता. मालेगावच्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. खा. राऊत यांच्या तब्येतीमुळे देखील हा विचार करण्यात आला. आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केले आहे. दादा भुसे काय करू शकतो आणि काय नाही याची कल्पना राऊत साहेबांना आहे. त्यांनी देखील खात्री करून बातमी द्यायला होती, असे त्यांनी म्हटले.


















