Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Mumbai: मुंबईतील ओशिवारा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात अभिनेता कमाल आर खान (Kamal R Khan)याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. 18 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ओशिवारातील नालंदा इमारतीत गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. विशेष म्हणजे हा गोळीबार एका मॉडेल आणि एका लेखकाच्या घराच्या दिशेने करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. या घटनेला फिल्म इंडस्ट्रीचा अँगल असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून नेमका गोळीबार का करण्यात आला, याचा सखोल तपास सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील ओशिवारातील नालंदा इमारतीमध्ये 18 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गोळीबार थेट एका मॉडेल आणि लेखकाच्या घराच्या दिशेने झाल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून तपास सुरू केला.
पुराव्यांचा अभाव, तांत्रिक तपासातून अटक
या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता. गोळीबार घराच्या आतून करण्यात आल्यामुळे घटनास्थळी फारसे पुरावे हाती लागत नव्हते. ओशिवरा पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी तांत्रिक तपास त्यासोबत वेगवेगळ्या अँगलने तपास करून अभिनेता कमाल खान याला अटक केली आहे.