Badlapur Crime News : बदलापुरात स्त्री बीज विक्रीचं रॅकेट उघड, 3 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल; तपास सुरू
बदलापूर महिलेकडून घरातूनच बेकायदेशीररीत्या गर्भाशयातील स्त्री बीज वाढविण्यासाठी लागणारी इंजेक्शन्स देऊन महिलांचे स्त्री बीज काढून विक्री करण्याचा प्रकार सुरू असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आला आहे.
या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
सुलक्षणा जयवंत गाडेकर या महिलेने तिच्या घरामध्ये स्त्रिबीज वाढविण्यासाठी लागणारी इंजेक्शन्स बेकायदेशीररीत्या साठवून ठेवली होती.
गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून डॉक्टरांचा सल्ला न घेता सोनोग्राफी करून त्यांना संबंधित इंजेक्शन्स देण्यात येत होते.
त्यानंतर गर्भाशयातील स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IVF/ART सेंटरमध्ये पाठवून तेथील डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती असा आरोप आहे.
या प्रकरणी बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकाने गाडेकर यांच्या घरी धाड टाकून हे रॅकेट उघडकीस आणले.
त्यानुसार बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सावंत यांच्या तक्रारीवरून तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात आरोपींनी सोनोग्राफी सेंटर, IVF/ART सेंटर चालक, इंजेक्शन पुरवठादार आणि बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या
व्यक्तींशी संगनमत करून महिलांकडून वारंवार डोनरचे काम करून घेत शारीरिक शोषण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
शिवाय आरोपी महिलेच्या मोबाईलमध्ये गर्भधारणेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफी करतानाचे छायाचित्रे, काही महिलांच्या खोट्या नावाने तयार केलेली
सत्यप्रतिज्ञापत्रे, बनावट कागदपत्रे, विविध महिलांचे फोटो तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती आढळून आली आहे .
या प्रकरणी सुलक्षणा गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वा राहणार उल्हासनगर आणि मंजुषा वानखडे राहणार उल्हासनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून
त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे बदलापूर परिसरात सुरू असलेल्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या रॅकेटचा बदलापूर पूर्व पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.



















