AI VS JOB : AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जाणार? कोण सुरक्षित?
मित्रांनो, सध्या सगळीकडे एकच हवा आहे... ती म्हणजे AI (एआय)...कोणी म्हणतंय AI मुळे क्रांती येईल, तर कोणाला काळजी वाटतीये की आपली नोकरी तर जाणार नाही ना?
नुकतंच IBM कंपनीचे CEO अरविंद कृष्णा यांनी एक मोठा इशारा दिलाय. ते म्हणतात, येणाऱ्या काळात अनेक नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. नक्की काय भानगड आहे? चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया!
कोणत्या नोकऱ्या धोक्यात आहेत?
अरविंद कृष्णा यांच्या मते, सगळ्यात जास्त फटका बसणार आहे तो कॉल सेंटर आणि बॅक-ऑफिस कामांना. जिथे रोज तेच तेच काम करावं लागतं, जसे की फोनवर उत्तरे देणे, डेटा भरणे किंवा बिलांचे हिशोब जुळवणे, अशी कामं आता मशीन आरामात करू शकतात. त्यांनी तर स्पष्टच सांगितलंय की, कॉल सेंटरमधल्या 50% नोकऱ्या येणाऱ्या काळात कमी होऊ शकतात.
स्टॅनफोर्डचा रिपोर्ट काय म्हणतो?
आता तुम्ही म्हणाल, हे फक्त मोठ्या लोकांसाठी आहे का? तर नाही. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने एक अभ्यास केलाय. त्यात असं दिसलंय की, ज्यांचं वय 22 ते 25 आहे, म्हणजे जे आत्ताच नोकरीला लागलेत, त्यांच्या रोजगारात 13 टक्क्यांनी घट झालीये. का? कारण जे काम एखादा फ्रेशर करतो, तेच काम आज ChatGPT किंवा Copilot सेकंदात करून देतंय.
मग कोणाला टेन्शन नाही?
- घाबरून जाऊ नका! काही क्षेत्रं अशी आहेत जिथे AI चं डाळ शिजणार नाही
- डॉक्टर आणि आरोग्य सेवा: रुग्णांचा डेटा खूप गुंतागुंतीचा असतो, तिथे मशीनपेक्षा माणसाचा अनुभव जास्त कामाला येतो.
- बांधकाम क्षेत्र (Construction): घर बांधणं काय डिजिटल काम नाहीये. तिथे प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करावं लागतं, त्यामुळे गवंडी, इंजिनिअर्स सुरक्षित आहेत.
- शिक्षण क्षेत्र: शिक्षकाची जागा मशीन कधीच घेऊ शकत नाही.
तर मग आता करायचं काय? हात पाय गाळून बसायचं का? मुळीच नाही! अरविंद कृष्णा एक छान गोष्ट म्हणालेत, जुन्या नोकऱ्या गेल्या तरी नवीन नोकऱ्या जास्त प्रमाणात तयार होतील.
पण त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल: AI शी मैत्री! जे लोक AI ला आपला शत्रू न मानता, त्याचा वापर करायला शिकतील, तेच या स्पर्धेत टिकतील. तुम्ही किती अनुभवी आहात आणि तुम्ही किती नवीन गोष्टी शिकता, यावरच तुमचं भविष्य ठरणार आहे.
थोडक्यात काय तर, AI माणसाला रिप्लेस नाही करणार, पण जो माणूस AI वापरतोय, तो मात्र साध्या माणसाची जागा नक्की घेईल!
तुम्हाला काय वाटतं? तुमच्या कामात AI चा त्रास होतोय की फायदा?
























