Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधी हे इंडिया आघाडीच्या जवळपास 200 खासदारांसह दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलनासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं आहे. त्याचसोबत आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी देशाची लोकशाही धोक्यात आणली असून त्यांना राजीनामा द्यावाच लागेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी त्यांना दिल्ली पोलिसांनी अडवलं. राहुल गांधी यांनी तब्बल 8 तास आकाशवाणी भवनवर ठिय्या मांडला. त्यानंतर रात्रीच्या वेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.