Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Chandrapur Mayor Election 2026: गेल्या काही दिवसांपासून त्रिशंकू अवस्थेत अडकलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तानाट्याचा अखेर मंगळवारी नाट्यमय शेवट झाला. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घेत भाजपने राजकीय चमत्कार घडवत चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली आहे. अवघ्या एका मताच्या फरकाने भाजपच्या संगीता खांडेकर यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकली असून, काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदासाठी 34 चा बहुमताचा आकडा गाठायचा होता. या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांना 32 मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवाराला 31 मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. यामुळे बहुमताचा आकडा 33 वर पोहोचला. एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतल्याने निकालावर निर्णायक परिणाम झाला. अवघ्या एका मताने मिळालेल्या विजयामुळे भाजपच्या गोटात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
या सत्तास्थापनेत उद्धव ठाकरे गटाची भूमिका निर्णायक ठरली. भाजपकडून संगीता खांडेकर या महापौरपदाच्या उमेदवार होत्या, तर ठाकरे गटाकडून प्रशांत दानव हे उपमहापौरपदी विराजमान होणार आहेत. भाजप आणि ठाकरे गटामध्ये सत्तावाटपाचा ठरलेला फॉर्म्युला महत्त्वाचा ठरला. त्यानुसार महापौरपद सव्वा-सव्वा वर्षांसाठी प्रत्येकी दोन टर्ममध्ये वाटून घेण्यावर एकमत झाले असून, पहिल्या सव्वा वर्षांसाठी स्थायी समितीचे अध्यक्षपद ठाकरे गटाला देण्यात येणार आहे.
भाजपकडे सुरुवातीला 24 नगरसेवकांचे संख्याबळ होते. यामध्ये भाजपचे 23 आणि शिवसेना शिंदे गटाचा एक नगरसेवक होता. त्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील गट भाजपसोबत आला. सहा ठाकरे गटाचे नगरसेवक आणि दोन अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे भाजपचे संख्याबळ 32 वर पोहोचले. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. यामुळे बहुमताचा आकडा 33 वर पोहोचला. तर एमआयएम तटस्थ राहिल्याने काँग्रेसचे संख्याबळ 31 वरच अडकले.
























