सांगली : गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील महापुरामुळे सांगलीतल्या दूध उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सांगलीतलं दूध उत्पादन प्रतिदिन तीन लाख लिटरने घटलं आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यातल्या दूध उत्पादनातही दोन लाख लिटरने घट झाली आहे. दुग्धविकास अधिकारी अरुण चौगुले यांनी माहिती दिली. जनावरांचा मृत्यू आणि चारा टंचाईमुळे उत्पादनात घट झाल्याचं समोर आलं आहे.
सांगली जिल्ह्यात गायी, म्हशींसह सुमारे 40 हजार पाळीव जनावरं आहेत. जिल्ह्यात नदीकाठावर असलेल्या चार तालुक्यांना आगस्ट महिन्यात आलेल्या महापुराचा फटका बसला. नदीकाठावरील चार तालुक्यांतच मोठ्या संख्येने दुभती जनावरे आणि दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे. या महापुरात सांगलीतल्या हजारो जनावरांचा मोठ्या संख्येने मृत्यू झाला. तर पूर नसलेल्या तालुक्यात चारा टंचाईमुळेही दूध उत्पादन घटलं.
परिणामी दूध टंचाईमुळे यंदा दूध खरेदी दरातही वाढ झालेली दिसत आहे. दुधाच्या टंचाईमुळे दूध पावडर उत्पादन केवळ पाच टक्क्यांवर आलं आहे. दुधाला मागणी असल्याने गाईच्या दुधाचा खरेदीदर 18 वरुन 29 रुपये, तर म्हशीच्या दुधाचा दर 38 वरुन 44 रुपयांवर पोहोचला आहे.
मराठवाड्यातील अतिरिक्त दूध मिरजमधील शासकीय दूध डेअरीत पावडर निर्मितीसाठी पाठवण्यात येत होतं. मात्र दुधाच्या टंचाईमुळे मराठवाड्यातून येणारे दूध आता बंद झाल्याने शासकीय दूध डेअरीची खासगी संघांकडून होणारी पावडर निर्मिती बंद झाली आहे.