मुंबई : अजित पवारांनी 54 आमदारांची यादी राज्यपालांना दाखवून फसवणूक केली. परंतु भाजपला बहुमत स्पष्ट करता येणार नाही. मात्र त्यानंतर आम्ही तीन पक्ष मिळून सत्ता स्थापन करु. कुठलंही संकट आलं तरी आम्ही तिघे एकत्रच राहणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यात राजकीय भूकंप घडला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, राजभवनात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचं कथन केलं.
तसंच जे अजित पवारांसोबत राजभवनावर गेले, अजून काही त्यांच्यासोबत जाणार असतील, त्यांनी लक्षात ठेवावं पक्षांतरबंदीचा कायदा लागू होतो, असा इशाराही शरद पवारांनी दिला.
नाव आणि स्वाक्षरीसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांची यादी कार्यालयात ठेवली होती. अजित पवारांनी ती यादी घेतली आणि राजभवनावर गेले. ती यादी दाखवून राज्यपालांची फसवणूक केली. त्यांच्यासोबत 10 ते 11 आमदार होते, असा दावा शरद पवारांनी सांगितलं. यानंतर अजित पवारांसोबत राजभवनात गेलेल्या आमदारांनाही पत्रकार परिषदेत बोलावून तिथे काय घडलं याची माहिती देण्यास सांगितलं. अजित पवारांनी आपल्याला राजभवनात का नेलं याची कोणतीही कल्पना नसल्याचं आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर, भुसारा यांनी सांगितलं.
अजित पवारांचा निर्णय भाजपच्या धोरणाविरोधात
शरद पवारांनी सांगितलं की, "शनिवारी बैठक झाल्यावर काही गोष्टी घडल्या. मला एक सहकाऱ्याने कळवलं की आम्हाला राजभवनावर आणलं आहे. मला आश्चर्य वाटलं की राज्यपाल सकाळी साडेसहा वाजता आहे. नंतर समजलं की, अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काही सदस्य राजभवनावर गेले. हा निर्णय अजित पवारांचा आहे, आमच्या धोरणाविरोधात आहे. राष्ट्रवादी विधीमंडळ नेता असो किंवा कोणताही कार्यकर्ता तो भाजपसोबत जाणार नाही, याचा मला विश्वास आहे. जे सदस्य गेले, त्यांना पूर्ण माहिती असावी, असं मला वाटतं. जे सदस्य गेले किंवा जाणार असतील त्यांना दोन गोष्टी माहित असतील. एकतर पक्षांतर बंदी कायद्यातील तरतूदी लागू होऊन सदस्यत्व जाईल. महाराष्ट्रातील जनमानस भाजपबरोबर सरकार बनवण्यासाठी तयार नाही. त्यामुळे जर कोणी निर्णय घेतला तर त्यांच्या मतदारसंघातील जनता पाठिंबा देणार नाही. सदसत्वाचा राजीनामा दिला आणि निवडणूक झाली तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन त्यांना पराभव करतील."
अजित पवारांनी 54 आमदारांची यादी दाखवून फसवणूक केली : शरद पवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Nov 2019 01:31 PM (IST)
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यात राजकीय भूकंप घडला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, राजभवनात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचं कथन केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -