Nashik Crime : सापासोबत स्टंट करतानाचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशा जीवघेण्या स्टंटबाजीमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरातील सर्पमित्राने मात्र वेगळ्याच कारणासाठी अशी स्टंटबाजी केली आहे. सर्पमित्राने पत्नीच्या त्रासाला कंटाळून पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागाबरोबर स्टंट करत असताना ओठांना दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सिन्नर महाविद्यालय परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. नागेश श्रीधर भालेराव असे मृत सर्पमित्राचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून पत्नीसोबत पटत नसल्याने कौटुंबिक वाद होत होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ क्लिप बनवत जीवाचे बरेवाईट करेल असे म्हटले होते. यानंतर त्याने सिन्नर महाविद्यालयात परिसरात पकडलेल्या कोब्रा सापासोबत स्टंट करताना चुंबन घेताना नागाने त्याला दंश केला. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
नागेश हा सिन्नर शहरातील वेल्डिंग वर्कशॉपसह होर्डिंग चिकटवण्याचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचबरोबर तो गेल्या काही वर्षांपासून सर्पमित्र म्हणून परिसरात परिचित होता. दरम्यान काही दिवसांपासून पत्नीसोबत वाद झाल्याने तो घराबाहेर राहत होता. दोघांचा वाद एवढा टोकाला गेला होता कि, नागेशने दोन दिवसापूर्वी स्वतःची व्हिडीओ क्लिप बनवत पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे त्याने म्हटले होते. तसेच त्याने स्टँम्प पेपरवर विवाहात फसवणूक झाल्याचा उल्लेख केला होता. नागेशच्या पत्नीकडून त्याला व कुटुंबियांना मानसिक त्रास होत असल्याचे त्याने स्टँम्प पेपरवर नमुद केले होते. पत्नीकडून त्याला वेळोवेळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येत असल्याने तो कंटाळून घर सोडून गेल्याचे त्याने व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणी पती गायब झाल्याची तक्रारही नोंदवली होती. मात्र नागेश हा सिन्नर शहरातच असल्याचे त्याने व्हिडीओ क्लिपमधून सांगितले होते. दरम्यान शुक्रवारी त्याने परिसरात पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागाला सिन्नर महाविद्यालयासमोरील कॅफेमध्ये आणले. या कॅफेवरील बिल्डिंगच्या गच्चीवर जात नागेश याने नागासोबत स्टंटबाजी करण्यास सुरवात केली. यावेळी नागाने त्याच्या ओठांना व गालाला तीन वेळेस दंश केल्याचे समजते. घटनेनंतर त्याच्या मित्रांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नागेशला तात्काळ उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
सापासोबत स्टंटबाजी नडली!
नागेश हा काही वर्षांपासून सर्प पकडण्याचे काम करत होता. मात्र, आजवर त्याला कुठल्याही प्रकारचा दुखापत झाली नाही, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळलेला असल्याने त्याने घर सोडण्याचाही निर्णय घेतला होता. या प्रकरणी पत्नीकडून तो बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर त्याने मोबाईलवर स्वत:चा व्हिडीओ बनवत बेपत्ता नसून इथेच असल्याचे त्याने सांगितले होते. तसेच पत्नीच्या त्रासाला कंटाळलो असल्याने आत्महत्या करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याचे त्याने व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटले होते. तर दुसरीकडे त्याने नागाला पकडून त्याच्यासोबत स्टंट करताना सापासोबत स्टंट करताना त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.