अँटिगा: विराट कोहलीच्या टीम इंडियानं अँटिगा कसोटी जिंकून वेस्ट इंडिज दौऱ्यात विजयी सलामी दिली. टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 92 धावांनी धुव्वा उडवून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन. अश्विनच्या फिरकी माऱ्यासमोर विंडीज फलंदाजांनी दुसऱ्या डावात अक्षरश: नांगी टाकली. अश्विननं 83 धावांच्या मोबदल्यात सात विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवला.
चौथ्या दिवसाच्या उपाहारापर्यंत वेस्ट इंडिजनं दोन बाद 76 धावांची मजल मारली होती. पण उपाहारानंतर अश्विननं प्रभावी मारा करुन वेस्ट इंडिजचं कंबरडं मोडलं. त्यामुळं विंडीजची आठ बाद 132 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मग कार्लोस ब्रॅथवेट आणि देवेंद्र बिशूनं नवव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी रचून विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अश्विननं बिशूला माघारी धाडून ही जोडगोळी फोडली आणि विंडीजचा दुसरा डाव 231 धावांवर आटोपला.
कार्लोस ब्रॅथवेटनं नाबाद 51, तर बिशूनं 45 धावांची खेळी केली. दरम्यान टीम इंडियाचा आशिया खंडाबाहेरचा हा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला.
विंडीजचा डावानं पराभव, भारताचा दणदणीत विजय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2016 02:29 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -