पुणे : भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप यांचे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले आहे. डॉ. स्वरुप यांचे आज (7 सप्टेंबर 2020) रात्री नऊ वाजता निधन झाल्याची माहिती एनसीआरएने दिली आहे. अशक्तपणा आणि इतर काही तब्बेतींच्या कारणांमुळे त्यांना 10 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे अंत्यसंस्कार पुण्यातील औंध स्मशानभूमी, (रात्री) 11.30 वाजता होणार आहे.
डॉ. गोविंद स्वरूप यांना भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक बोलले जाते. कल्याण येथे प्रायोगिक रेडिओ दुर्बीण उभारून त्यांनी भारतात या शास्त्राचा श्रीगणेशा केला. पुणे जिल्ह्यामध्ये खोडद या गावी त्यांच्या पुढाकाराने रेडिओ दुर्बिणींचे संकुलच उभारण्यात आले. 'मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण' (जीएमआरटी) म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय ठरलेला आहे. भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचा लौकिक जगभर नेणारे उमदे आणि उत्साही शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप आज आपल्यात नाहीत.
प्रो. स्वरूप यांची थोडक्यात माहिती
- गोविंद स्वरूप, भारतीय रेडिओ खगोलशास्त्रचे जनक आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओचे संस्थापक संचालक.
- टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे अॅस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए).
- प्रा. स्वरुप यांचा जन्म ठाकूरवाड्यात 1929 साली झाला. ते जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि रेडिओ खगोलशास्त्राचे प्रणेते होते.
- प्रा. स्वरूप यांनी अलाहाबाद विद्यापीठातून 1950 साली एम.एस्सी. पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून 1961 साली पी.एचडी पूर्ण केली. त्यानंतर ते टाटा इंन्स्टीट्युटमध्ये जॉईन झाले.
- प्रो. स्वरुप यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री, भटनागर पुरस्कार आणि ग्रोटे रेबर पदक. ते अनेक प्रतिष्ठीत संस्थेचे सदस्य देखील होते. त्यांना रॉयल सोसायटीची फेलोशिप देखील मिळाली होती.