मुंबई : देशात सध्या क्रिकेटची चर्चा सुरु असताना दुसरीकडे मात्र वेधार्थ थाप्पा नावाचा तरुण रिबॉकच्या क्रॉसफिट गेम्स मध्ये आंतराष्ट्रीयस्तरावर भारताचं नाव रोशन करत आहे. 2016 ते 2019 अशी गेली चार वर्ष वेधार्थला रिबॉक क्रॉसफिटतर्फे भारताचा 'फिटटेस्ट मॅन' म्हणून भूषवण्यात आले आहे आणि आता पुन्हा एकदा तो देशाचं प्रतिनिधित्व करण्याकरीती 2020 मध्ये अमेरिकेत होणाऱ्या रिबॉक क्रॉसफिट गेम्ससाठी सज्ज झाला आहे.


क्रॉसफिटची स्पर्धा पूर्णपणे शारीरिक व्यायामावर असून अनेक प्रकारचे खेळ या स्पर्धेत खेळले जातात. प्रत्येक खेळाला शारीरिक बळाची गरज असते. वजन उचलणे तसेच स्प्रिंट सारखे अनेक खेळ इथे खेळले जातात. रिबॉक क्रॉसफिट गेम्समध्ये स्पर्धक म्हणून निवड करण्यासाठी रिबॉकचे प्रतिनिधी स्वतः अनेक देशात जाऊन शेकडो उमेदवारांची चाचणी करतात. कॉलेजला असताना तो राज्यस्थरावर व्हॉलीबॉल आणि क्रिकेट खेळला आहे. वेधार्थला आधीपासूनच फिटनेसची आवड असल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच क्रॉसफिटचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तेव्हा भारतात क्रॉसफिट प्रसिद्ध नव्हते. 2016 साली त्याने भारताचं प्रतिनिधित्वकरत पहिल्यांदा क्रॉसफिट गेम्समध्ये विजय मिळवला आणि तेव्हा पासून त्याची गाडी सुसाट सुटली आहे. भारतात क्रॉसफिट जनजागृती करण्याची वेधार्थची इच्छा आहे. त्यासाठी त्याने स्वतःच मुंबईत अल्फा सेवन सीझ नावाने क्रॉसफिट जिम सुरु केले असून तो स्वत: त्यात प्रशिक्षण घेतो व इतरांना ही प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहित करत आहे.

हल्ली धावपळीच्या आयुष्यात अनेक लोकांना साधारण जिमला जाणे आणि तंदुरुस्त राहणे फारस काही जमत नाही. त्यात क्रॉसफिटचे प्रशिक्षण तुम्हाला कमी वेळेत फिट व निरोगी ठेवण्यास खूप फायदेशीर ठरते व त्याच बरोरबर शारीरिक बळ व शरीराला आकार देण्यास ही याचा फार उपयोग होतो.