टीव्ही मालिकेतील कृष्णाची बदलती रुपं
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आज सर्वत्र उत्साह आहे. बाल गोपाळ कृष्णजन्माष्टमीचा आनंद साजरा करण्यासोबतच, दहीहंडी फोडण्यासाठी आतुर झाले आहे. पण आज आम्ही तुम्हाला काही अशा अभिनेत्यांची नावं सांगणार आहोत, ज्यांनी टीव्हीवरील अध्यात्मिक मालिकांमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारली.
सर्वात शेवटची श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारीत मालिका 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. स्टार प्लस या टीव्ही चॅनेलवरील 'महाभारत' या मालिकेत सौरभ राज जैन याने श्रीकृष्णाची भूमिका साकारली.
पंजाबच्या विशाल कारवाल हा इंडस्ट्रीमध्ये आला होता रावडी भूमिका साकारण्यासाठी. पण 'द्वारकाधीश' या मालिकेने त्याची व्यक्तीरेखाच बदलली. विशालने द्वारकाधीश या मालिकेत अतिशय प्रेमळ कृष्ण साकारला.
ध्रुती बतारा निरागस आणि सोजवळ चेहऱ्यांने प्रेक्षकांना बाल कृष्णाचे दर्शन घडवले. ध्रुतीने 'जय श्री कृष्णा' या मालिकेत बाल श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. तिच्या नटखट आणि खट्याळ भूमिकेने प्रेक्षकांना भूरळ पाडली.
रामानंद सागर यांच्या 'कृष्णा' या मालिकेत मराठमोठा अभिनेता स्वप्नील जोशीने श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती.
90 च्या दशकातील बी. आर. चोप्रांची 'महाभारत' ही मालिका अनेकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत नितीश भारद्वाज यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. श्रीकृष्णाची भूमिका साकारणाऱ्या भारद्वाज यांना आजही अनेकजण त्याच भूमिकेत पाहतात.