Zero Hour Shiv Sena UBT MNS : Uddhav - Raj Thackeray एकत्र आल्यास महायुतीला फटका ?
नमस्कार मी प्रसन्न जोशी. झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. आधी कल्पना, मग अपेक्षा, त्यानंतर वादविवाद...अखेर टाळी आणि नंतर सगळंच सामसूम....शिवसेेनेतून राज ठाकरे वेगळे झाल्यानंतर गेल्या १८ वर्षात शिवसेना-मनसे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंधांचा लेखाजोखा मांडायचा तर तो याच शब्दात मांडावा लागेल. खरं तर उद्धव-राज यांनी एकत्र यावं ही अपेक्षा राज वेगळे झाल्यानंतर लगेचच व्यक्त होणं सुरु झालं होतं. त्यानंतर आलेल्या प्रत्येक महापालिका किंवा विधानसहबा निवडणुकांपूर्वी राज-उद्धव एकत्र या...अशी हाक कुणी ना कुणी देत होतंच. मात्र, राज ठाकरे गेल्यामुळे संपूर्ण शिवसेनेवर वर्चस्व स्थापन झालेले उद्धव ठाकऱ्यांना राज नको होते...आणि २००९च्या विधानसभेत १३ आमदार आणि २०१२ च्या मनपा निवडणुकांत मुंबई, नाशिक, पुण्यात मिळालेल्या लक्षणीय यशामुळे राज यांनासुद्धा शिवसेनेला पर्याय आपणच असं वाटू लागलं होतं. त्यातही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना फुटेल किंवा मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक राज यांच्याकडे जातील असंही बोललं जात होतं. त्यामुळे राज स्वत:ला आजमावत राहिले. पुढे २०१४ला भाजप-शिवसेना युतीची सत्ता महाराष्ट्रात आली आणि शिवसेना-मनसे एकत्र येण्याचं काही कारणच राहिलं नाही. उलट, २०१७च्या महापालिका निवडणुकांनंतर मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत जाण्यासाठी राज ठाकरेंनी टाळी दिली असतानाही शिवसेनेने मनसेचे नगरसेवक फोडले. त्यानंतर दोन्ही भाऊ आणि पक्ष यांच्यातली कटुता वाढतच गेली....मात्र, २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग, त्यानंतर उद्धव आणि शिवसेनेचे भाजप आणि मोदी-फड़णविसांशी व्यक्तिगत पातळीला बिघडत गेलेले संबंध, राज ठाकरेंची भाजपशी जवळीक असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांनी वर्चस्व मिळवलेल्या शिवसेनेचा प्रभाव यामुळे मुद्दा उद्धव किंवा राज यांचा न राहता ठाकरे ब्रँडच्याच अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला. त्यातही, मनसेची २००९नंतर शून्याच्या दिशेने झालेली घसरण....२०२४च्या विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या सेनेची निचांकी कामगिरी...यामुळे आता एकत्र यावंच लागेल.....अशी निर्वाणीची स्थिती निर्माण झाली. त्यातूनच गेल्या काही दिवसात पुन्हा राज आणि उद्धव यांच्याकडून एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले गेले आणि आता तर थेट अमित ठाकरे यांनीच दोन्ही भावांनी बोलायचं हवं असं म्हणूनच चर्चा अधिकच पुढे नेलीये....त्याच पार्श्वभूमीवर आहे आजचा झिरो अवर....पुढे जाण्यापूर्वी पाहुया त्यावरचा प्रश्न.....