Zero Hour Ratan Tata : भारताचा 'रतन' हरपला ; Girish Kuber यांच्या नजरेतून रतन टाटा समजून घेताना...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनमस्कार, मी विजय साळवी. आपण पाहाताय झीरो अवर. मंडळी, तुम्ही आम्ही प्रत्येकजण एक माणूस म्हणून जन्माला येतो. पण आपण खरोखरच माणूस म्हणून जगतो का? किंवा आपण माणुसकीच्या नात्यानं अवतीभवतीच्या समाजात खरंच वावरतो का? हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचं कारण ज्येष्ठ उद्योगमहर्षी रतन टाटा यांनी त्यांच्या ८६ वर्षांच्या आयुष्यात निर्माण केलेला माणुसकीचा आदर्श. टाटा समूहाचे प्रमुख या नात्यानं एक यशस्वी उद्योजक अशी त्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. पण रतन टाटांच्या व्यक्तिमत्त्वातून पैशांच्या श्रीमंतीपेक्षा माणुसकीच्या वैभवाचीच अनुभूती समाजाला कायम आली. टाटा या ब्रॅण्डसोबत नांदणारी विश्वासार्हता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू होताच, पण त्यासोबत रतन टाटांनी समाजाला कर्तृत्त्व, दातृत्व आणि मानवतेचीही आयुष्यभर शिकवण दिली. ज्यांच्या पायाशी मांडी घालून बसावं आणि चार गोष्टी शिकून घ्याव्यात अशा मोजक्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांपैकी ते एक होते. त्यामुळंच रतन टाटा यांच्या निधनानं टाटा कुटुंबीय आणि टाटा समूह यांच्याइतकंच भारत देश आणि भारतीय समाजाचंही मोठं नुकसान झालंय. रतन टाटा हे भारतीय उद्योगविश्वाचे आधारवड होतेच, पण तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या आणि नेत्याअभिनेत्यांच्या आयुष्यातही त्यांनी आपल्या हयातीत जणू दीपस्तंभाची भूमिका बजावली. रतन टाटा आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी ८६ वर्षांच्या आयुष्यात तुम्हाआम्हाला दिलेली नीतीमूल्यांची शिदोरी इतकी मोठी आहे की, तुमच्या आमच्यासह पुढच्या कित्येक पिढ्यांनाही ती शिदोरी त्यांच्या आयुष्यभर पुरणार आहे. मंडळी, आजचा हा झीरो अवर शो, रतन टाटा यांच्या कर्तृत्वाला, दातृत्त्वाला आणि नेतृत्त्वाला समर्पित करताना, सुरुवातीला पाहूयात त्यांच्या उद्योगक्षेत्रातल्या कारकीर्दीवर एबीपी माझाचा रिपोर्ट.