Zero Hour Full : 'ठाकरेंचा सेवक' बॅनरमुळे नाराजी ते काँग्रेसचं नो मनसे... नो एमआयएम; सविस्तर चर्चा
उद्या बिहारमध्ये मतमोजणी आहे... आणि आपल्याकडे इलेक्शन फिव्हर वाढत चाललाय... आता तुम्ही म्हणाल... की या दोन्हीचा काय संबंध? तर थेट संबंध आहे... आजच्या झीरो अवरमध्ये आपण हा संबंध कसा आहे... ते बघणार आहोत... त्यासाठी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते...
राज्यात वेगानं राजकीय घडामोडी घडतायत... पक्षांतरं सुरूयत... युत्या-आघाड्या मोडतायत... जुळतायत... सख्खे मित्र वैरी होतायत... हाडवैरी गळ्यात गळे घालतायत... निवडणुकांचा माहौल आहे, त्यामुळे रोज नवीनवीन छोटे मोठे रूसवे फुगवे, दिलजमाई होतच राहणार... आज मात्र सगळ्यात जास्त लक्ष वेधलं ते भल्या पहाटे मुंबईत लागलेल्या एका बॅनरनं...
त्याचं झालं असं... की हार्ट ऑफ मुंबई... म्हणजे आमच्या दादरमध्ये सेनाभवनाच्या अगदी समोर एक बॅनर झळकला. आता तुम्ही म्हणाल... की निवडणूक आली की बॅनर लागणारच... त्यात काय एवढं? पण बॅनर लागला ही बातमी नाहीये, तर त्या बॅनरवर काय लिहिलंय, ही बातमी आहे...बॅनरवर लिहिलं होतं 'ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक' . सगळ्यांनाच बोचलेलं वाक्य... लक्की वामन कर्डक या मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याच्या नावे हा बॅनर झळकवला... आणि 'ठाकरेंचा सेवक' या शब्दांवरून भाजपनं टिकेचं मोहोळ उठवलं. पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या सेवक मानसिकतेवर बोट ठेवत ठाकरे बंधूंना जोरात टोले लगावले. चंद्रकांत खैरे आदित्य ठाकरेंच्या पाया पडले त्या, काही वर्षांपूर्वी गाजलेल्या घटनेचीही त्यांनी आठवण करून दिली.राजेशाही गेली आणि ठाकरेंची सरंजामशाही आली.अशी बोचरी टीका केली गेली...
लोकशाहीत अशी मानसिकता बाळगणं योग्य आहे का.. हा प्रश्न आम्हालाही पडला... आणि तोच आम्ही आमच्या प्रेक्षकांनाही विचारलाय... पोल सेंटरला जाऊयात हा प्रश्न बघण्यासाठी....