Zero Hour Full : मविआचं मुंबईतील जागावाटप ते वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहिंसा ही मनुष्याची सर्वात मोठी ताकद आहे... आणि ती जगातील कोणत्याही शस्त्रापेक्षा अधिक ताकदवान आहे....
तुमच्या आजूबाजूला घडत असलेल्या घटना पाहिल्या तर आजच्या जगात अहिंसेच्या शिकवणीचीच सर्वाधिक गरज आहे. तोच अहिंसेचा संदेश घेवून... अवघ्या जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींची आज जयंती होती. त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन सुरुवात करुयात आजच्या झीरो अवरला.
नमस्कार मी विजय साळवी.. झीरो अवरच्या विशेष भागात आपलं स्वागत.. महाविकास आघाडी आणि महायुतीचं विधानसभेसाठीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलंय.. आणि दोन्ही पातळ्यांवरच्या जागावाटपातील बातम्यांचं आपण आज विश्लेषण करणार आहोत.. मात्र, आजच्या भागाची सुरुवात करुयात.. महाविकास आघाडीच्या जागावाटपातील इनसाईड स्टोरीनं...
मविआनं लोकसभा निवडणुकीआधी ज्या लवचिकतेनं जागावाटपाचं कोडं सोडवलं.. तीच लवचिकता विधानसभेसाठीच्या जागावाटपात दाखवताना महाविकास आघाडीची दमछाक होताना दिसतेय.. कारणही तसंच आहे.. लोकसभेआधी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खिंडार पडली.. आणि नव्या चेहऱ्यांना पुढे येण्याची संधी मिळाली..
पण, लोकसभा निवडणुकीतल्या मोठ्या यशानंतर मविआतच जागांवरुन चढाओढ सुरु झाल्याचं गेल्या दोन महिन्यांपासून दिसतंय..
आता हेच पाहाना.. गेल्या तीन दिवसांपासून मविआच्या रोज बैठका होतायत.. अगदी आजही बैठक झाली. या बैठकीला ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे काही प्रमुख नेते उपस्थित होते.. आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त जागांवर एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिली. पण त्याशिवाय जागावाटपाच्या चर्चेतील एक इनसाईड स्टोरी आहे.. ती आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..
मविआच्या बैठकांमध्ये जागावाटपात चर्चा या विभागनिहायच झाल्या... सीटिंग-गेटिंग... म्हणजे जिथं ज्या पक्षाचा सीटिंग आमदार आहे.. ती जागा त्याच पक्षाला सोडण्याचा फॉर्म्युलाही मांडण्यात आला.. आणि त्यानुसार जागावाटपाचं सत्र सुरु झालं.. सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून झाली.. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई उपनगर.. अशा विभागवार समित्यांची स्थापना झाली.. त्यांच्या त्यांचा चर्चेनंतरच कोणती जागा कोणत्या पक्षाला जाणार.. याचे निर्णय झालेत..
त्यानुसार विदर्भात काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जास्त जागा शरद पवारांच्या वाट्याला येतील. इकडे मुंबई उपनगर आणि कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचं पारडं जड राहू शकतं.
पण, असं असलं तरी मुंबईचं कोडं मविआची डोकेदुखी ठरु शकतं.. आणि तेही अवघ्या बारा जागांमुळे...
मुंबई आणि मुंबई उपनगरात मिळून विधानसभेच्या आहेत ३६ जागा.. त्यातल्या २३ जागांचा तिढा सुटलाय.. त्यानुसार ठाकरेंची शिवसेना तेरा, कांग्रेस आठ, राष्ट्रवादी एक आणि समाजवादी पक्षाला एक अशा २३ जागांवर मविआत एकमत झालंय. याच जागावाटपावर आणखी सखोल विश्लेषणासाठी मुंबई काँग्रेस माजी अध्यक्ष भाई जगताप असणार आहेत... त्यांच्याशी चर्चा करण्याआधी पाहुयात आजचा आपला पहिला प्रश्न... तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला..
ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये आपलं पुन्हा स्वागत..
आता बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील एका वादाची... त्या वादाचे धागे महाराष्ट्राला जोडले गेले आहेत..
महाराष्ट्रातल्या शिर्डीच्या साईबाबांचे भक्त जगभरात आहेत..
उत्तर प्रदेशातील वाराणसीतल्या मंदिरांमधूनही साईंच्या मूर्ती आहेत.. पण याच मूर्तींवरुन आता वाद सुरू झाला आहे. काशीच्या प्रसिद्ध 'बडा गणेश' मंदिरासह जवळपास १४ मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली आहे. सनातन रक्षक दलाकडून हे काम सुरु आहे. "साईंबद्दल अनादर नाही.. साईपूजेला विरोध नाही मात्र इतर देवांच्या मंदिरात साईंची मूर्ती नको" अशी सनातन रक्षक दलाची भूमिका आहे. आणखी जवळपास २८ मंदिरांमधून मूर्ती काढणार असल्याचं सांगितलं जातंय. "आम्ही कोणत्याही हिंदूंच्या आस्थेच्या आड नाही पण ज्यांना साईबाबांची पूजा करायची आहे त्यांनी साईंचं वेगळं मंदिर बांधून पूजा करावी" असं या हिंदुत्ववादी संघटनेंचं मत आहे. या वादाला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्नही सुरु आहे. उत्तर प्रदेश ते महाराष्ट्र सगळीकडेच राजकीय पक्ष या वादात उतरले आहेत.उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार असणं तसंच विरोध करणारी संघटना हिंदुत्ववादी असणं या मुद्द्यांवरुन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी या घटनेचा विरोध नोंदवला आहे. मात्र ही संधी विरोधक सोडतील असं सध्या तरी दिसत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपविरोधात हा मुद्दा वापरण्यात आला तर नवल वाटायला नको. वाराणसीत गणेश मंदिरांमधून, महादेवाच्या मंदिरांमधून साई मूर्ती हटवणारे सनातन रक्षक दलाचे अजय शर्मा काय म्हणाले ते पाहुयात..