Zero Hour : सरकारी बंगल्यांवरुन राजकीय मानापमान; ते मंत्रिपदी बढती,अधिकाऱ्यांची झाडाझडती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही पाहाताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर.
मंडळी, महायुतीच्या नव्या सरकारच्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारून आता जवळपास दोन दिवस झालेत. नवे मंत्री म्हटलं की नव्यानं मिळणारा बंगला येतो. आणि त्या बंगल्यांच्याच वाटपावरून मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
मुंबईत मंत्र्यांसाठी एकूण ४२ बंगले आहेत. हे ४२ बंगले तीन परिसरांमध्ये वसलेले आहेत. पहिला अर्थातच मलबार हिल, दुसरा पेडर रोड आणि तिसरा नरीमन पॉईंट म्हणजे मंत्रालयाच्या समोर.
मलबार हिल आणि पेडर रोडवरील बंगले अधिक प्रशस्त आहेत. वर्षा, देवगिरी, नंदनवन, रॉयलस्टोन, रामटेक, ज्ञानेश्वरी, शिवगिरी, पर्णकुटी ही त्याची काही उदाहरणं. तर मंत्रालयासमोरचे बंगले तुलनेनं लहान आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थातच वर्षा बंगला मिळाला आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नंदनवन बंगल्यातच राहणार आहेत. गेल्या सरकारमध्ये अजित पवारांकडे देवगिरी बंगला होता, यापुढेही त्यांनी देवगिरी बंगल्यात राहणं पसंत केलंय.
आज चर्चेमध्ये असणारा बंगला म्हणजे रामटेक. हा बंगला खरं तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आला होता. पण पंकजा मुंडेंनी या बंगल्यात राहण्याची आपली इच्छा बावनकुळेंकडे व्यक्त केल्याचं कळतं. बावनकुळेंनीही त्याला लगेच होकार दिला अशी चर्चा आहे. पंकजा यांचं या रामटेक बंगल्याशी भावनिक नातं आहे. कारण त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे मंत्री असताना रामटेक बंगल्यावर राहायचे.
रामटेक हा सर्व सरकारी बंगल्यांमधला सर्वात सुंदर बंगला मानला जातो. या बंगल्याच्या लॉनवरून थेट समुद्र पाहण्याचा आनंद घेता येतो. रामटेकपासून हाकेच्या अंतरावर फडणवीसांचा सागर बंगला आहे. अर्थात, फडणवीस आता काही दिवसच सागरवर असतील, मुख्यमंत्री या नात्यानं त्यांना आता वर्षावर शिफ्ट व्हावं लागेल.
दरम्यान, सरकारी बंगल्यांवरून यंदा जाहीर रस्सीखेच झाली नसली तरी त्याची चर्चा कायमच होत असते. त्यावरच आहे आजचा आमचा दुसरा प्रश्न. त्यावरील प्रतिक्रिया आपण काही वेळानं पाहणारच आहोत, पण त्याआधी प्रश्न पाहूयात, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला.