Sangli Flood : महापुरातली लगीनगाठ! घोडा नको, गाडी नको... थेट बोटीतून वरात Viral Video
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली शहराला गेल्या चार दिवसांपासून महापुराचा विळखा बसलाय. जवळपास निम्मे शहर पाण्याखाली गेले आहे. एकीकडे आपल्या कुटुंबाची चिंता पूरग्रस्त सांगलीकरांना लागलेली असतानाच हौसेला काही मोल नसतं असाच प्रकार सांगलीमध्ये पाहायला मिळाला आहे. महापुराच्या पाण्यातूनच नवदाम्पत्य बोटीने घरी पोहोचत गृहप्रवेश केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सांगलीतील गावभागामध्ये राहणारा आणि हरभट रोडला स्वत:चे सलून असलेला सलून व्यावसायिक तरुण रोहित सूर्यवंशीचे अचानक लग्न ठरलं. मुहूर्त मेढ रोवली त्या दिवशी देखील पूरपरिस्थिती येणार असं वातावरण होतं. पण आता लग्न कसे रद्द करायचे म्हणून गड्याने आणि त्याच्या कुटुंबाने एका छोट्या मंगल कार्यालयात शासकीय परवानगी घेऊन 25 लोकांच्या साक्षीने लग्न उरकले. सगळे फोटोसेशन झले. वधू सासरी निघाली आणि कळाले की कृष्णा नदीची पातळी वाढली आहे. त्यामुळे वधूला बोटीनेच घरी जावे लागणार आहे.
गावात उंचावर आणि अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर रोहित राहत होता. त्यामुळे तिथे पाणी जायचा काही प्रश्न नव्हता. प्रश्न होता तो वधू-वराने घरी कसे जायचे? वधू सासरी कशी जाणार? गृहप्रवेश कसा होणार? रीतिरिवाजा नुसार नववधूला सासरी नेऊन गृहप्रवेश तरी करायला हवा.मग काय ठरलं. बोटीने ही जोडी गावामधील घराकडे जाऊ लागली. फौजदार गल्लीत ही नवविवाहित जोडी बसली आणि घराकडे येता येता मारुती चौक लागला. बोटवाला म्हणाला, पडा बोटीतूनच पाया. मग ही जोड मारुती चौकातील मारुतीरायाला बोटीतूनच पाया पडले आणि घराकडे गेली.
गावभागमध्ये जाताना सगळीकडे अपार्टमेंटच्या खाली पाणी होते. मग पाण्यातुनच वाट काढत या जोडीचे स्वागत आणि वधूचा गृहप्रवेश झला. बोटीत बसल्यानंतर काही तरूणांनी या दाम्पत्याचे फोटो, व्हिडीओ काढले. सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल झाले. पुरात बोटींतून वाट काढत गृहप्रवेश केलेली जोडी म्हणून जोडी हिट झाली. पण सोशल मीडियावर काही मंडळीनी या जोडीने प्रसिद्धीसाठी बोटीतुन प्रवास केला, मुद्दाम देवदर्शन केले अशा कमेंट केल्या.पण रोहितने यावर स्पष्टीकरणं दिले आहे. तो म्हणाला, "हे व्हिडीओ आम्ही नाही तर बोटींतून येत असणाऱ्या काही तरुणांनी काढले आहे. तसेच आम्ही गावभागात अशा ठिकाणी आणि फ्लॅटमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहतो. जिथे कधीच पाणी येत नसल्याने आम्ही लग्न उरकल्यानंतर बोटीने घरी जण्याचा निर्णय घेतला. यात ना स्टंटगिरी होती ना नियम मोडले, अशी भावनाही जोडप्याने व्यक्त केली.