Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले पालघर जिल्ह्यातील जव्हार हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. पावसाळा सुरू होताच येथील धबधबे पर्यटकांना आकर्षित करू लागतात. त्यात सर्वाधिक प्रसिद्ध असलेला जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा सध्या पर्यटकांनी गजबजून गेला आहे. विशेष म्हणजे पर्यटन विकासाच्या माध्यमातून शासनाने येथे आकर्षक काचेचा व्ह्यूइंग ब्रिज उभारला असून त्यावरून धबधब्याचे विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. पाहूया आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट. जव्हारच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये वसलेला दाभोसा धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत आहे. जव्हार शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्याची उंची जवळपास ३०० फूट आहे. दाभोसा, हिरडपाडा आणि काळ मांडवी हे परिसरातील प्रसिद्ध धबधबे असले तरी दाभोसा धबधब्याची ओळख वेगळी आहे. या धबधब्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो बाराही महिने प्रवाही असतो. त्यामुळे वर्षभर पर्यटक येथे भेट देतात. मात्र पावसाळ्यात परिसरात पसरलेली हिरवाई, दाट धुके आणि फेसाळत कोसळणारा धबधबा यामुळे येथील सौंदर्य अधिकच खुलून दिसते. त्यामुळे पालघरसह मुंबई, गुजरात, नाशिक आणि सिल्वासा येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत आहेत. निसर्गाच्या या अद्भुत सौंदर्याची खास सफर पाहा एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमधून.