Santosh Deshmukh Beed : संतोष देशमुख हत्येचं प्रकरण, जातीयवादाचं वळण Rajkiya Sholey Special Report
पुरोगामी महाराष्ट्रात मतपेटीच्या राजकारणात जातीला अनन्यसाधारण महत्व आहे. पुरोगामी महाराष्ट्रात मारणाऱ्याची आणि मरणाऱ्याची जात आधी शोधण्याची क्लेशदायी प्रथा वाढीला लागलीय का असा प्रश्न पडतो.. अत्याचार करणारा आणि पीडीत याची जात कोणती यावर घटनेचा कोणी, किती निषेध करायचा हे ठरतंय का असाही प्रश्न पडतो.. संतोष देशमुख हत्या प्रकरणात हेच चित्र पुरोगामी महाराष्ट्रात पाहायला मिळतंय का असाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो.. जातीचा मुद्दा आज चर्चेत का राहिला? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
गेले ३-४ दिवस भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्र टीकेचे धनी बनले आहेत.
धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यामुळे नामदेव शास्त्रींना ट्रोल करणं सुरुच आहे.
जात बघून नामदेव शास्त्री भूमिका घेत असल्याचा आरोप केला जात आहे. आरोप करणाऱ्यांमध्ये आज आणखी एका नावाची भर पडली. ते नाव आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं. एखाद्या घटनेला समाजाशी जोडणं चूक आहे असं मतही वडेट्टीवारांनी व्यक्त केलं.
संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख भगवानगडावर गेले होते. तिथे त्यांनी नामदेवशास्त्रींना कागदपत्र सादर केली. यावेळी देशमुख कुटुंबियांनी कधी जातीवाद केला नाही असा दावा त्यांनी केला. त्यांच्याच सुरात सुर मिसळला मनोज जरांगे यांनी. असेे जातीवादी शब्द महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऐकले आहेत अशी टिपण्णी जरांगेंंनी केली.
त्याचं त्याचं उघड पडत आहे, जे बोलायचं आहे ते बोलून गेले, टोळीने दाखवलं किती जातीवाद असतो.... असेे जातीवादी शब्द महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऐकले आहेत... आरोपींचे समर्थन करणारे शब्द महाराष्ट्रचं नुकसान आहे, पोटातील ओठावर आले.... बाबाला दोष देत नाही, करून घेणारी टोळी आहे.... स्वतः साठी देवधर्म कळेना.... काही लोकांनी ओबीसीच्या नावाखाली अन्याय सहन केला.... ओबीसी असून देखील त्यांच्यावर अन्याय झाला... आता लोक व्यक्त होत आहे.....))
धनंजय देशमुख यांचे आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी फेटाळून लावले. संतोष देशमुख प्रकरणात जातीय राजकारणाची सुरवात कोणी केली ? हा प्रश्न बबनराव तायवाडे यांनी धनंजय देशमुख यांना केला. तर यात जात पात आणणं चुकीचं असल्याचं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.
या घडामोडींचे पडसाद अहिल्यानगरमध्येही उमटले. तिथे सकल मराठा समाजाने नामदेव शास्त्रींविरोधात पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिलं.
नामदेव शास्त्री हे वंजारी आणि मराठा समजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हे प्रकरण एवढ्यावरच थांबण्याची चिन्ह नाहीत.
जातीचा संबंध नाही असं सगळे जण कितीही सांगत असले तरी, त्यात किती तथ्य आहे याची जाणीव प्रत्येकाला आहे. जातीवाद, जातीद्वेष वाईटच पण काही राजकारणी आपल्या सोयीचं असेल तेव्हा काही ठराविक जातींविरोधात द्वेषपूर्ण बोलण्याला प्रोत्साहन देतात हे सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलं आहे. असा दुटप्पीपणा किमान हत्येसारख्या संवेदनशील गोष्टीत तरी कोणीही आणू नये ही आशा.
कृष्णा केंडेसह गोविंद शेळके, एबीपी माझा बीड