Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
एकत्र निवडणूक लढणाऱ्या युतीला किंवा आघाडीला जेव्हा सत्ता स्थापन करण्यापुरतं बहुमत मिळतं, तेव्हा घोडेबाजार होणार नाही, असा साधारण समज असतो. पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. मुंबईत सध्या हेच घडतंय. मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र लढणाऱ्या भाजप आणि शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलंय. मात्र तरीही सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. त्यातच सत्तास्थापनेच्या गणितात ठाकरेंच्या शिवसेनेचीही पडद्यामागून एन्ट्री झाल्याची चर्चा सुरु झालीय. त्यामुळं मुंबईत नेमका कुणाचा महापौर बसणार, याचं उत्तर अद्यापही अस्पष्ट आहे. पाहूया, याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट.
तर अशा प्रकारे मुंबईच्या महापौरपदाचा मुद्दा आता 'देवाच्या इच्छे'वर येऊन थांबलाय.
खरं तर परमेश्वर, ईश्वर, विधाता, भगवान असे अनेक शब्द उपलब्ध असताना जाणीवपूर्वक वापरला जाणारा ‘देवाची इच्छा’ हा सध्या मुंबईच्या समीकरणांमध्ये कळीचा शब्द बनलाय.
दावोस दौऱ्यावर गेलेले मुख्यमंत्री फडणवीस, ताज लँड्स हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आणि देवाच्या इच्छेची वाट बघत बसलेली ठाकरेंची शिवसेना..
यामुळं मुंबईत नेमकी कशी सत्तासमीकरणं जुळणार, याची उत्सुकता निर्माण झालीय.
एकीकडं शिंदेंकडून आपल्या नगरसेवकांची काळजी घेतली जात असतानाच भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत पडद्यामागे बोलणी सुरु झाल्याची चर्चा आहे.
मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचं महत्त्व कमी करण्यासाठी ठाकरेंकडून भाजपला अप्रत्यक्ष मदत केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.