Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट सर्वसामान्य भारतीयांवर होऊ लागलाय. पेट्रोल पंपावर, गॅस एजन्सीबाहेर लागलेल्या रांगा हे त्याचंच उदाहरण. पण आता पेट्रोलच्या कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी राज्यातील नागरिकांनी ई बाईक्सला पसंती दिली आहे. गेल्या महिनाभरात ई बाईक्सच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे.... पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट सामान्य माणसाच्या खिशावर आणि जगण्यावर पडू लागले आहेत. पेट्रोल पंपांवरील लांबच लांब रांगा आणि गॅसचा तुटवडा यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच, भंडारा जिल्ह्यात एक वेगळंच सकारात्मक चित्र पाहायला मिळतंय. पेट्रोलच्या कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी भंडाऱ्यातील नागरिक आता 'इलेक्ट्रिक बाइक्स'ला पसंती देत आहेत. गेल्या २८ दिवसांत जिल्ह्यात ई-बाइक्सच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे तासनतास पंपावर उभे राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मात्र, या संकटावर भंडाऱ्यातील जनतेनं आता एक नवा मार्ग शोधला आहे. एकूणच काय, तर युद्धाच्या संकटामुळे का होईना, पण भंडारा जिल्हा आता 'इको-फ्रेंडली' प्रवासाकडे वेगाने पाऊल टाकत असल्याचं चित्र दिसत आहे. इंधनाचा तुटवडा हे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीसाठी एक मोठं टर्निंग पॉईंट ठरलं आहे.
गॅस सिलेंडरअभावी घराघरांत चुली पेटल्या आहेत किंवा इंडक्शनचा वापर वाढला आहे, त्याच धर्तीवर आता वाहतुकीसाठी 'पेट्रोल नको, पण ई-बाइक हवी' असा सूर उमटत आहे. युद्धापूर्वी भंडाऱ्यात दिवसाला जेमतेम ४ ते ५ इलेक्ट्रिक गाड्या विकल्या जात होत्या. पण युद्धाच्या अवघ्या २८ दिवसांत हा आकडा थक्क करणारा आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात ६०० हून अधिक इलेक्ट्रिक बाइक्सची विक्री झाली आहे. युद्धाच्या बातमीमुळे आणि इंधनाच्या तुटवड्यामुळे अचानक मागणी वाढली आहे. नागरिक आता ई-बाइक बुक करत असल्याचं चित्र भंडाऱ्यात बघायला मिळतं आहेत.