Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
राजकारणात जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या नेत्यांना प्रत्येक वक्तव्य जपून करावं लागतं. अति उत्साहाच्या भरात केलेली विधानं वादाला आमंत्रण देतात. सध्या मंत्री गिरीश महाजनांचं असंच एक विधान वादाच्या केंद्रस्थानी आलंय. अमृतसरमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना महाजनांनी ऑपरेशन ब्लू स्टारबाबत आपलं मत व्यक्त केलं आणि वादाला तोंड फुटलं. महाजन नेमकं काय म्हणाले आणि त्यानंतर काय घडलं, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून.
संजय राऊत - दहशतवादाविरुद्ध सगळ्यात मोठी लढाई केली आणि पंजाब देशात ठेवलं. त्याला तुम्ही काळा दिवस म्हणत असाल तर तुमच्यासारखे गद्दार आणि देशद्रोही तुम्हीच.
नवनाथ बन - उद्धवजी ठाकरेंनी वाझे काय लादेन आहे का, असं समर्थन केलं होतं. त्यावेळी उद्दव ठाकरेंच्या हकालपट्टीची मागणी तुम्ही केली नाही.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री असणाऱ्या गिरीश महाजनांनी अमृतसरमध्ये केलेल्या एका वक्तव्यानं नवी आपत्ती ओढवून घेतलीय.
निमित्त होतं पंजाबच्या अमृतसरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ४२ व्या शहिदी समागम कार्यक्रमाचं.
महाराष्ट्राचे सरकारी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या मंत्री गिरीश महाजनांनी ऑपरेशन ब्लू स्टारबाबत दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींवर जोरदार टीका केली.
यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी ६ जूनचा उल्लेख काळा दिवस असा केल्यामुळं वादाची ठिणगी पडली.
१९८४ मध्ये झालेल्या कारवाईत प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये लपून बसलेला खलिस्तानवादी जर्नेल सिंग भिंद्रेनवालासह त्याच्या अनेक सशस्त्र समर्थकांना ६ जून रोजी कंठस्थान घालण्यात आलं होतं. शीख धर्मियांची सर्वोच्च संस्था असणाऱ्या अकाल तख्तकडून जर्नेल सिंह भिंद्रेनवालेला शहीद दर्जा दिला गेलाय. पण भारत सरकारच्या दरबारी मात्र भिंद्रेनवालेची नोंद उग्रवादी अशी आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेल्या गिरीश महाजनांनी ६ जूनचा उल्लेख काळा दिवस असा केल्यामुळं वादाला तोंड फुटलं.
All Shows
































