Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस अनेक कारणांसाठी वेगळा ठरला. मनोज जरांगेंशी चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीला जाणार नसल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. शिवाय संविधानानुसार आणि कोर्टाच्या निर्णयानुसार योग्य असतील, तेवढ्याच मागण्या मान्य होतील, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. तर जरांगेंच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याचं सांगत त्यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन उदय सामंतांकडून करण्यात आलं. यानंतर जरांगेंनी सरकारवर पलटवार करत एकही मागणी मान्य झाली नसल्याचा दावा केला. आज दिवसभरात नेमकं काय घडलं, याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून.
गेल्या ११ दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरु केलेल्या मनोज जरांगेंबाबत सरकारनं आता आपली भूमिका स्पष्ट केलीय.
आतापर्यंत जेव्हा जेव्हा मनोज जरांगेंनी उपोषणं केली, तेव्हा तेव्हा सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री आणि अधिकारी त्यांची समजूत काढण्यासाठी जात होते.
यावेळी मात्र या प्रथेला फाटा देत सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीला जाणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलंय.
मनोज जरांगेंच्या मागण्यांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काय मिळेल आणि काय मिळणार नाही, याबाबत स्पष्ट मांडणी केलीय.
शिवाय एकाच्या ताटातलं दुसऱ्याला मिळणार नसल्याचं सांगत अवास्तव मागण्यांना थारा मिळणार नसल्याचंही स्पष्ट केलंय.
तर सरकारकडून घेण्यात आलेल्या या भूमिकेनंतर जरांगेंनी आपल्या टीकेची धार अधिकच वाढवलीय.
विशेषतः अंतरवालीत सरकारचं शिष्टमंडळ येणार नसल्याच्या विखेंच्या घोषणेनंतर जरांगेंनी त्यांच्यावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला चढवलाय.
फडणवीस आणि शिंदेंवर टीका करताना मनोज जरांगेंकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांचं अनेकदा कौतुक करण्यात आलं होतं.
या गोष्टीची सल व्यक्त करत उदय सामंतांनी जरांगेंना त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याची आठवण करून दिलीय.
तर सामंतांनी केलेले दावे फेटाळून लावत जरांगेंनी सामंतांवर पलटवार केलाय.
मनोज जरांगे हे हैद्राबाद गॅझेटमधल्या नोंदीनुसार आरक्षणासाठी आग्रही असताना आता सकल मराठा समाजाकडून एसईबीसी आरक्षणाचा मुद्दा उचलला जाणार असल्याचे संकेतही या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आले.
एकीकडे मनोज जरांगेंकडून वापरली जाणारी भाषा..
दुसरीकडं जरांगेंसोबत चर्चेसाठी शिष्टमंडळ न पाठवण्याचा सरकारचा पवित्रा
आणि सकल मराठा समाजाकडून जरांगेंच्या कार्यशैलीवर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न..
यामुळे उपोषणाच्या ११ व्या दिवशी मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवं स्वरुप येत असल्याचे संकेत मिळालेत.
आता भविष्यात हे आंदोलन कुठल्या दिशेनं जातं आणि जरांगेंच्या उपोषणाचा हा अध्याय पुढे काय वळण घेणार, याकडं सर्वांचंच लक्ष असणार आहे.
All Shows































