Nagpur Accident | अल्पवयीन दुचाकीस्वाराच्या धडकेत राज्यस्तरीय धावपटू मयुरी पटले जखमी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर : नागपूरसह राज्यातील इतर मोठ्या शहरात बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या बाईकर्सचा धुमाकूळ नवीन नाही. मात्र, अशाच मस्तवाल बाईकर्सनी नागपुरात एका राज्यस्तरीय धावपटूला मृत्यूच्या दाढेत ढकललं आहे. अल्पवयीन दुचाकी चालकांनी एकमेकांशी शर्यत लावून मयुरी पटलेला गंभीर जखमी केलं असून सध्या रुग्णालयात तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. त्यामुळे पोलीस आणि कायदा अशा मस्तवाल बाईकर्सला धडा केव्हा शिकवेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अठरा वर्षांची मयुरी पटले. खेळाच्या मैदानातून स्वतःचा आणि गरीब आई वडिलांच्या स्वप्नांना बळ देण्याचा प्रयत्न करणारी नागपूरची तरुणी. मात्र, सध्या ती मृत्यूच्या दाढेत पोहोचली आहे. किंबहुना ढकलली गेली आहे. आणि तिच्या या अवस्थेसाठी बेदरकारपणे दुचाकी चालवून इतरांचा जीव धोक्यात टाकणारे दोन अल्पवयीन वाहन चालक कारण ठरले आहेत.
मयुरी खेलो इंडिया या केंद्र सरकारच्या तरुण खेळाडूंसाठीच्या स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळण्यासाठी लवकरच भोपाळला जाणार होती. त्यासाठीच 9 फेब्रुवारीच्या सकाळी आपली प्रमाणपत्रं कोच हरेंद्र ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी मयुरी दाभा गणेशनगर मार्गाने जात होती. तेवढ्यात समोरून एकमेकांशी दुचाकीची शर्यत लावत वेगानं दुचाकी चालवत आलेल्या दोन अल्पवयीन दुचाकी स्वारांनी मयुरीच्या दुचाकीला जबर धडक दिली. मयुरी रस्त्यावर फेकली गेली. त्यात तिच्या डोक्याला, मेंदूला, डोळे, नाक, हातपाय, पाठीला जबर दुखापत झाली. अनेक हाडं मोडली गेली.
तिला लगेच वाडी परिसरातल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं गेली दोन दिवस ती शुद्धीवर आलेली नाही. मयुरीच्या अपघातानंतर तिचे वडील ही जबर मानसिक धक्क्यात आहेत. वाहनचालक असलेले वडील आणि मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या मयुरीच्या आईने पोटाला चिमटा घेत आजवर मयुरीला मैदानात पाठविलं. आणि मयुरीने ही अनेक वर्षे घाम गाळला. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आता जेव्हा राष्ट्रीय स्तरावर तिला संधी मिळण्याची वेळ आली, तेव्हा स्वतःच्या मस्तीसाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या मस्तवाल तरुणांमुळे तिचं स्वप्न धोक्यात आलं आहे. त्यामुळे अशा मस्तवाल धनिकपुत्रांना आणि त्यांच्या पालकांना धडा शिकवण्याची गरज असल्याची मागणी मयुरीच्या आई कविता पटले यांनी केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी अपघात प्रकरणी दोन्ही वाहन चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, मात्र ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांना दुचाकी सोपवून इतरांना धोक्यात घालणाऱ्या त्यांच्या पालकांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याची माहिती गिट्टीखदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली आहे.
मयुरीच्या मेंदूला मागील बाजूस जबर इजा झाल्यामुळे सध्या ही तिची स्थिती धोक्यात आहे. गेले दोन दिवस ती शुद्धीवर नाही, त्यामुळे पुढील काही दिवस तिच्यासाठी अत्यंत धोक्याचे आहेत. त्यानंतर ही ती पुन्हा आपल्या पायावर उभी राहून मैदानावर पोहोचेल आणि महाराष्ट्रासाठी मेडल्स जिंकेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे सध्या तरी तिला सर्वांच्याया प्रार्थनेची आणि रुग्णालयाच्या लाखोंच्या खर्चासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.