Pm Narendra Modi Mann Ki Baat : ऑस्ट्रेलिया आणि बुंदेलखंडच्या झाशीचं एक वेगळं नातं : पंतप्रधान मोदी
Mann Ki Baat LIVE : स्वातंत्र्यलढ्यात झाशी आणि बुंदेलखंडचे योगदान आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई यांसारख्या विरांगनाही येथे घडल्या आणि मेजर ध्यानचंद यांच्यासारखी क्रीडारत्नेही या प्रदेशाने देशाला दिली आहेत. ऑस्ट्रेलिया आणि आपल्या बुंदेलखंडच्या झाशीचेही एक वेगळे नाते आहे, असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी सांगितलं की, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध कायदेशीर लढा देत होत्या तेव्हा त्यांचे वकील जॉन लँग होते. हं जॉन लँग मूळचे ऑस्ट्रेलियाचे रहिवासी होते. भारतात राहून त्यांनी राणी लक्ष्मीबाईंचा खटला लढवला होता. इतिहासातील आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आपल्या बुंदेलखंडच्या झाशीचेही एक वेगळे नाते आहे, असं ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ नावाचे एक शहर आहे. क्रिकेटप्रेमी याच्याशी चांगलेच परिचित आहेत, कारण पर्थमध्ये क्रिकेटचे सामने होत असतात. पर्थमध्ये 'सॅक्रेड इंडिया गॅलरी' या नावाचे एक कलादालनही आहे. स्वान नामक दरीच्या सुंदर परिसरात हे कलादालन तयार करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील रहिवासी जगत तारिणी दासी यांच्या प्रयत्नांचे हे फळ आहे. जगत तारिणी खरे तर ऑस्ट्रेलियाच्या आहेत. त्यांचा जन्मही तिथेच झाला, तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या.पण त्यांनी 13 वर्षांपेक्षा जास्त काळ वृंदावनात व्यतीत केला. जगत तारिणीजींचा हा अप्रतिम प्रयत्न, खरोखरच, आपल्याला कृष्णभक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन घडवतो. या प्रयत्नाबद्दल मी त्यांना अनेकानेक शुभेच्छा देतो, असं ते म्हणाले.
भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित अनेक कलाकृतीही येथे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. एका कलाकृतीमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आहे आणि त्याच्या खाली वृंदावनातील लोकांनी आश्रय घेतला आहे. तारिणी दासी म्हणतात की त्या ऑस्ट्रेलियात परतल्या, आपल्या देशात परतल्या, पण त्या वृंदावनाला विसरू शकल्या नाहीत. त्याचमुळे वृंदावन आणि तिथल्या आध्यात्मिक भावनेशी जुळल्यासारखे वाटत राहावे, या भावनेतून त्यांनी ऑस्ट्रेलियातच वृंदावन वसवले.
कलेच्याच माध्यमातून त्यांनी अद्भूत असे वृंदावन घडवले. येथे येणाऱ्या लोकांना विविध प्रकारच्या कलाकृती पाहण्याची संधी मिळते. त्यांना भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे - वृंदावन, नवाद्वीप आणि जगन्नाथपुरी येथील परंपरांचे आणि संस्कृतीचे दर्शन घडते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.