Wari Special Superfast : आषाढी वारी स्पेशल सुपरफास्ट बातम्या, जय हरी विठ्ठल! 06 July 2025
abp majha web team | 06 Jul 2025 07:26 AM (IST)
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला दुग्धाभिषेक केला आणि त्यानंतर महाआरती केली. पूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या उगले दाम्पत्याला मिळाला. त्यांना मानाचे वारकरी म्हणून सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते उगले दाम्पत्याला शाल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, त्यांना एक वर्षाचा एसटीचा मोफत प्रवासाचा पासही देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे महाराष्ट्राची काळजी घेण्याचे बळ मिळो, यंदा चांगलं पीक येवो आणि बळीराजा सुखी व्हावा अशी प्रार्थना केली. पंढरपूर कॉरिडोरमुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ आणि सगळ्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दाखल झाल्यावर वाखरी पालखी तळावर वारकऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीने फुगडी खेळली. आषाढीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल भक्तांची मोठी गर्दी झाली होती. विठ्ठलाच्या दर्शनाआधी चंद्रभागेच्या वाळवंटावर स्नान करण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी होती. पंढरपूर शहरासह मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.