Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Tukaram Mundhe Majha Katta : आपल्याकडे दिसायला चांगलं आणि चवदार पदार्थ खाण्यावर भर दिला जातो, पण त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या रंगांमुळे किंवा इतर घटकांमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आपण चांगलं कसं दिसावं यासाठी मेहनत घेतो, मात्र जे खातो याबद्दल चौकस का राहत नाही? असा प्रश्ना एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विचारला. यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता वाढवण्याचं काम एफडीए करत असल्याचं ते म्हणाले. हे सांगताना त्यांनी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत आवडीच्या असलेले पनीर हे शुद्ध की भेसळयुक्त आहे हे कसं ओळखायचं हे सांगितलं.
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे हे एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी एफडीएकडून करण्यात येणाऱ्या कारवाया ते नागरिकांनी खाण्याच्या बाबतीत सजग कसं राहायचं, यावर चर्चा केली.
Pure Vs Adulterated Paneer : शुद्ध पनीर कसं ओळखायचं?
सर्वसामान्यांच्या आवडीचे पनीर हे शुद्ध आहे की भेसळयुक्त आहे हे कसं ओळखायचं याबद्दल तुकाराम मुंढे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, "एक किलो पनीर बनवायचं असेल तर किमान पाच लिटर दूध लागतं. गायीचं दूध 60 रुपये लिटर जरी पकडलं तरी त्यासाठी 300 रुपयांचं दूध गरजेचं आहे. तसेच इतर गोष्टी जसं की पॅकेजिंग, कामगारांचा पगार असं जर एकत्रित धरलं तर एक किलो पनीर तयार करण्यासाठी 400 ते 500 रुपये लागतात. त्याच्या आत शुद्ध पनीर तयार होऊ शकत नाही."
तुकाराम मुंढे पुढे म्हणाले की, "आपण बाजारात गेल्यानंतर 200 ते 300 रुपये किलो असे पनीर घेतो. त्यावेळी आपल्या मनामध्ये काहीच प्रश्न उपस्थित होत नाहीत. मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण स्वस्त पनीर घेतो. पण ते पनीरच आहे की इतर काही आहे हे आपण तपासत नाही. त्यामुळे आम्ही यामध्ये तपासणी केली असता 35 टक्के सॅम्पल्समध्ये भेसळ असल्याचं आढळून आलं. त्यासाठी पामतेल किंवा इंडस्ट्रियल ऑईलचा प्रामुख्याने वापर केला जात असल्याचं दिसून आलं. आपण प्रोटिन म्हणून खाणाऱ्या पनीरमध्ये फॅट असतं आणि ते आपल्या आरोग्याला अतिशय धोकादायक असतं."