Meta Verified:  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरने ब्लू टिकसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यानंतर मेटानेदेखील हाच मार्ग अवलंबला. 'मेटा'ने देखील फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंटच्या ब्लू टिकसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. आता, 'मेटा'ने भारतातील युजर्सना ब्लू टिकसाठी किती शुल्क आकारण्यात येईल, याची माहिती दिली आहे. 


मेटाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील वेब युजर्ससाठी 1,099 रुपयांच्या किमतीत मेटा व्हेरिफाइड अकाउंट ऑफर करणार आहे. तर, मोबाइल अॅप युजर्सना मेटा व्हेरिफाइडसाठी 1,499 रुपये मोजावे लागणार आहेत. 


मेटाकडून ही सशुल्क व्हेरिफाइड अकाउंटसाठीची ऑफर कधीपासून सुरू होणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.


वृत्तांनुसार, मेटा व्हेरिफाईडची सध्या बीटा फेजमध्ये चाचणी केली जात आहे. ज्यांना त्यांच्या मेटा अकाउंटवर व्हेरिफाईड स्टेटस मिळण्यासाठी समाविष्ट केले आहे. त्यांना त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरिफाइड करण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये सामील व्हावे लागणार आहे. Meta Verified सध्या बिझनेस अकाउंट आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्ससाठी उपलब्ध नाही. 


ट्विटर ब्लू प्रमाणेच, मेटा व्हेरिफाईड देखील ग्राहकांच्या मेटा खात्यांना (इन्स्टाग्राम आणि फेसबुक) ब्लू टिक मार्क देणार आहे. 


ब्लू टिक शिवाय या व्हेरिफाइड अकाउंटमध्ये अतिरिक्त फिचर्स दिले जाणार आहेत. यामध्ये कस्टर सपोर्ट, पोस्ट रिचमध्ये वाढ करणे, अकाउंट सिक्युरिटी आणि इतर फिचर्सचा लाभ मिळणार आहे. 


मेटाच्या ब्लू टिकसाठी काय करावे?


मेटाची ब्लू टिक हवी असेल तर about.meta.com/technologies/meta-verified वर जा आणि फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर क्लिक करून लॉग इन करू शकतात. त्यानंतर मेटाच्या व्हेरिफाइड अकाउंटसाठी विनंती करू शकता. त्यानंतर तुमचे अकाउंट वेटिंग लिस्टवर असेल. सशुल्क ब्लू टिक अकाउंटबाबत तुम्हाला मेटाकडून कळवण्यात येईल. 


ब्लू टिक अकाउंटसाठी कोण पात्र?


किमान 18 वर्षे वयाचा कोणताही फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर व्हेरिफाइड अकाउंटसाठी प्रयत्न करू शकता. खासगी आणि पब्लिक अकाउंट असणारे व्यक्तीदेखील आपले अकाउंट व्हेरिफाइड करू शकतात. मात्र, त्यासाठी त्यांचे अकाउंट अॅक्टिव्ह असावे. त्याशिवाय, त्यांना आपल्या ओळखीचा एक शासकीय ओळखपत्र म्हणून पुरावा द्यावा लागणार आहे.