Cyber Fraude Crime : सायबर गुन्ह्यांचा (Cyber Crime) सामना करण्यासाठी सरकारकडून नवनवीन पद्धती अवलंबल्या जात आहेत. अलीकडे सरकारने बेकायदेशीर गुंतवणूक आणि अर्धवेळ नोकरीची फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्सवर कारवाई केली आहे. वास्तविक या वेबसाईट्सकडून युजर्सची दिशाभूल आणि आर्थिक फसवणूकही करत होत्या. या वेबसाइट्स परदेशातून हाताळल्या जात होत्या आणि त्यांचे भारतात मोठे नेटवर्क होते, अशी माहितीदेखील समोर आली आहे.
गेल्या आठवड्यात इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत युनिटने वर्टिकल नॅशनल सायबर क्राइम थ्रेट अॅनालिटिक्स युनिटच्या मदतीने अशा वेबसाईट्सची पडताळणी केली होती. या कालावधीत, गुंतवणूक आणि टास्क-आधारित अर्धवेळ नोकरीच्या फसवणुकीत गुंतलेल्या 100 वेबसाइट्सची ओळख पटवण्यात आली आणि त्या ब्लॉक करण्यात आल्या. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 चा वापर करून या सर्व वेबसाइट्स ब्लॉक केल्या होत्या.
या वेबसाइट्स, टास्क आधारित संस्था बेकायदेशीर गुंतवणुकीत गुंतलेल्या आढळल्या आणि आर्थिक गुन्ह्यांशी जोडल्या असल्याचे आढळून आले. त्यांचे संचलन परदेशातून सुरू असल्याचे तपासादरम्यान उघड झाले. डिजिटल जाहिराती, चॅट मेसेंजर आणि भाड्याने घेतलेल्या खात्यांचा वापर गुन्हे करण्यासाठी केला जात होता. कार्ड नेटवर्क, क्रिप्टोकरन्सी आणि परदेशातील एटीएममधूनही परवानगीशिवाय पैसे काढले जातात.
MeitY ने 232 अॅप्स ब्लॉक केले होते आणि ते परदेशातून ऑपरेट केले जात होते. त्यात बेटिंग, जुगार आणि बेकायदेशीर कर्ज सेवा देणार्या चिनी अॅप्सचाही समावेश होता. Lazypay.in ला देखील ब्लॉक करण्यास सांगितले होते. ही डच गुंतवणूक फर्म Prosus ची उपकंपनी होती. मे महिन्यात चेस इंडियाच्या अहवालात स्वयं-नियामक संस्था स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती.
Telegram वर पार्ट टाईम जॉबसाठी मेसेज, खात्यातून उडाले 61 लाख
एका व्यक्तीला टेलिग्राम (Telegram) वर पार्ट टाईम जॉबसाठी (Part Time Job) मेसेज (Message) आला आणि त्याच्या खात्यातून लाखो रुपये लंपास झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरुमध्ये (Bengaluru) ही घटना घडली असून या व्यक्तीच्या खात्यातून तब्बल 61 लाख रुपये गायब झाल्याची घटना घडली आहे.
उदय उल्लासला टेलिग्रामवर पार्ट टाईम नोकरीची ऑफर मिळाली. ऑफर पाठवणारी सायबर गुन्हेगार एक महिला होती. या महिलेने तिचं नाव सुहासिनी असल्याचं सांगितलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या पार्ट टाईम जॉबमध्ये व्यक्तीला वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करुन काम करण्यास सांगितलं होतं.
10 हजार रुपयांची पहिली गुंतवणूक
या महिलेने आधी उदयचा विश्वास जिंकला आणि त्याला गुंतवणूक करण्यास सांगितलं. मोठी गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळण्याचं आमिष दाखवलं आणि योजनेबद्दल सांगितलं. या महिलेने उदयला सुरुवातीला 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून 20 लाखांपर्यंत कमाई करणयाचं आमिष दाखवलं.