नवी दिल्लीः टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंहने पंजाबकडून खेळताना बडोद्याविरुद्धच्या रणजी सामन्यात 260 धावांची विक्रमी खेळी केली आहे.  रणजीच्या गेल्या चार सामन्यात युवराजने आतापर्यंत 587 धावा ठोकल्या आहेत. त्यातली ही सर्वोच्च खेळी आहे.


बडोद्या विरुद्ध खेळताना सलामीवीर मनन वोहराच्या साथीने युवी आणि वोहराने विक्रमी भागिदारी रचली. युवीने 260 धावा उभारल्या तर वोहराने 224 धावांची खेळी केली.

यापूर्वी खेळताना बडोद्याचा डाव 529 धावात आटोपला होता. या धावांच्या बदल्यात युवराजच्या पंजाब संघाने आतापर्यंत 7 विकेट गमावत 665 धावा ठोकल्या आहेत. पंजाबकडे सध्या 136 धावांची आघाडी आहे.

बडोद्याकडून कर्णधार दिपक हूडाने सर्वाधिक नाबाद 293 धावा ठोकल्या. तर धीरेन मिस्त्री याने 76 धावांची खेळी केली.

युवराजने गेल्या चार सामन्यात 83 च्या सरासरीने 587 धावा ठोकल्या. यामध्ये दोन शतकं, एक द्विशतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. दरम्यान युवराजने पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे. गेल्या चार सामन्यातील युवराजची कामगिरी पाहता तो पुन्हा एकदा त्याच्या जुन्या शैलीत मैदानात दिसत आहे.