नवी दिल्ली: टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह आणि अभिनेत्री हेजल नुकतेच लग्न बंधनात अडकले. ज्यामध्ये टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडूही सहभागी झाले होते. पण यावेळी त्याच्या वडिलांनी नाराजी लपून राहिली नाही. युवराजचे वडील योगराज सिंह लग्नाला उपस्थित होते. पण त्यानंतर त्यांनी आपल्या मनातील अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत.
योगराज सिंह यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की 'जर युवराजचं लग्न एखाद्या धार्मिक गुरुच्या इथं झाल्यास आपण त्या लग्नाला हजेरी लावणार नाही. मी देवावर विश्वास ठेवतो. पण कोणत्याही धार्मिक गुरुवर नाही.' असं ते लग्नाआधी म्हणाले होते. पण तरीही त्यांनी लग्नाला हजेरी लावली. मात्र त्यानंतर या सगळ्या गोष्टीवर त्यांनी टीका केली.
लग्नसोहळावर टीका करताना त्यांनी मुलगा युवराज सिंहवरही टीका केली आहे. 'मी हैराण आहे की, शिकले सवरलेले लोकं या साधूंच्या मागे कसे लागतात? मी इतर कुणाला काय बोलणार? कारण की, माझं कुटुंबच या सगळ्यात अडकला आहे. मी युवीला 16 वर्षापर्यंत क्रिकेट खेळायला शिकवलं. पण त्यानं मला एक साधा 'कुर्ता'ही दिला नाही. तर दुसरीकडे धार्मिक गुरुंना मात्र, त्यानं आजवर अनेक कार दिल्या आहेत.'
यानंतर योगराज सिंह म्हणाले की, 'मला फक्त एवढं जाणून घ्यायचं आहे की, एखाद्या बाबानं त्याला क्रिकेट खेळायला शिकवलं की मी? त्याचा कॅन्सर कोणत्या बाबानं बरा केला का? कारण, युवी म्हणतो की, बाबाच्या आशीर्वादानं आपण पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतलो.'
याशिवाय योगराज सिंह हेजलच्या नाव बदलण्यावरुनही चांगलेच भडकले. हेजलचं नाव गुरुबसंत कौर ठेवणं हे देखील बाबाच्या सांगण्यानुसार करण्यात आलं असेल असं योगराज सिंह म्हणाले.
दरम्यान, युवराजच्या लग्नात योगराज यांनी हजेरी लावली होती. पण त्यानंतर आता त्यांनी आपल्या मनातील गोष्टी उघड केल्या आहेत.