2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तला पुरुषांच्या 60 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळालं होतं, तर रशियाच्या बेसिक खुदोखोजला रौप्यपदक मिळालं. 2013 साली एका कार अपघातात खुदोखोजचा मृत्यू झाला.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) लंडन ऑलिम्पिकदरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांची पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यात खुदोखोज दोषी आढळला. त्यामुळे त्याचं रौप्यपदक योगेश्वर दत्तला मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मात्र या प्रकरणी चौकशी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेसिकचं रौप्यपदक त्याच्या नावेच राहील.
म्हणून दिलदार योगेश्वर दत्तचा रौप्यपदक घेण्यास नकार
योगेश्वरने दिलदारपणा दाखवत ते पदक दिवंगत पैलवान बेसिक खुदोखोजच्या कुटुंबीयांनीच ठेवावं असं म्हटलं होतं. 'खुदोखोज हा आपला चांगला मित्र होता, त्यामुळे त्याचं रौप्यपदक घेणं मला विचित्र वाटत आहे. लंडन ऑलिम्पिकपूर्वी दोन महिने मी रशियात प्रशिक्षण घेत होतो. त्यामुळे बेसिकशी माझी खूप छान ओळख झाली होती.' असं योगेश्वर दत्तने ट्विटरवर म्हटलं होतं. योगेश्वरने ट्वीट करत खुदोखोजच्या कुटुंबीयांनी त्यांच्या दिवंगत मुलाचं पदक स्वतःजवळ ठेवावं, असं म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला.