Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर (Jantar Mantar) सुरु असलेल्या कुस्ती पैलवानांच्या आंदोलनात (Wrestlers Protest) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आता बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि विनेश फोगाट (Vinehs Phogat) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आंदोलकांना राजकीय फायद्यासाठी निषेध आणि प्रदर्शनाचे साधन म्हणून वापरु नका असा सल्ला कुस्तीपटूंनी दिला आहे. "भारतातील मुलींना न्याय मिळावा यासाठी मी लढा देत आहे, मात्र काही लोक या निषेधाला 'प्रक्षोभक आंदोलन' म्हणून मांडण्याचा किंवा ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत," असं कुस्तीपटू बजरंग पुनियाने म्हटलं आहे.


आंदोलनस्थळी मोदीविरोधी घोषणाबाजी


देशातील काही दिग्गज महिला कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) प्रमुख आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटू बृजभूषण यांच्याविरोधात निदर्शनं करत आहेत. या आंदोलनादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती आंदोलनस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदीविरोधी घोषणाबाजी करताना दिसत आहे.


मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा : बजरंग पुनिया


याबाबत टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता पैलवान बजरंग पुनिया म्हणाला की, "काही लोक आंदोलनाला वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आमच्या निषेधात सामील झाले असून त्यांना हे 'प्रक्षोभक आंदोलन' बनवायचं आहे. याला आमचा विरोध आहे. हे आंदोलन म्हणजे भारतातील मुलींना न्याय मिळवून देण्यासाठीचा लढा आहे, भारतीय कुस्तीला वाचवण्याचा लढा आहे आणि इथे जे लोक एकत्र जमले आहेत ते कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नसून आमच्या समर्थनार्थ आहेत." "राजकारण आणि इतर गोष्टी नंतर येतात, महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा आधी येते," असं बजरंग पुनिया म्हणाला. तसंच आंदोलकांना राजकारण न करण्याचं आवाहन देखील त्याने केलं आहे. "हे खेळाडूंचे आंदोलन आहे, त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होऊ नका," असं पुनियाने सांगितलं. 


सामान्य माणूसही आदरास पात्र : विनेश फोगाट


याबाबत महिला पैलवान विनेश फोगाट म्हणाली की, "आम्ही घटनात्मक पदांवर बसलेल्या सर्वांचा आदर करतो. त्यांच्या सन्मानाच्या विरोधात आम्ही काहीही बोलणार नाही, पण सामान्य माणूसही आदरास पात्र आहे आणि आम्हालाही सन्मान मिळाला पाहिजे."


बृजभूषण सिंह यांच्यावर अखेर गुन्हा


भारतीय कुस्तीचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 एप्रिलला एका अल्पवयीन मुलीसह सात कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रार करणाऱ्या अल्पवयीन मुलीला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. दुसरीकडे अटक होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार कुस्तीपटूंनी केला आहे.